शेतकरी साधारणपणे मे महिन्यात शेतातील आंतरमशागतीची कामे आटोपून जून महिन्यात मृग नक्षत्राचा पाऊस आल्यावर धान पेरणी करू, असा बेत आखत होते. मात्र, गतवर्षी मृगाचा अपेक्षित पाऊस आला नाही. त्यामुळे पेरणीचे काम आद्रा नक्षत्रात करावे लागले होते. या वर्षी मात्र मृग नक्षत्र सुरू झाले, तेव्हापासून अधूनमधून पाऊस येत आहे, त्यामुळे भातखाचरात अधिक ओलावा आहे. अशा अवस्थेत धान पेरणी करणे शेतकऱ्यांना अवघड जात असते. सध्या भातखाचरात नांगरणी केली असल्याने सखल भागात पाणी साचून शेत जमिनीत दलदल झाली आहे. त्यामुळे पेरणी काम अशा परिस्थितीत केले जात नाही, म्हणून शेतकरी मृगाचा शेवटच्या चरणात तरी पेरणी करू, या आशेवर दिवस मोजत आहेत. मृगाच्या पावसात केलेल्या पेरण्या शेतीला सुबक अशा असतात. मात्र, पावसाने उसंत घेऊन कडक उन्ह लागल्यास पेरणीचे काम करण्यासाठी सोयीचे होत असते. यासाठी शेतकरी बी-बियाणे यांची सोय करून ठेवली आहे, तर काही शेतकरी बी-बियाणांच्या वाढत्या किमतीमुळे घरगुती बियाणे वापरण्यासाठी बियाणे पेरणीलायक करीत आहेत. तालुक्यातील काही भाग वगळता खरिपातील पीक हे वरच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी जमिनीत अपेक्षित ओलावा प्राप्त झाल्यानंतर पेरणीचे काम करीत असतात. रोवणी खर्च कमी करण्यासाठी शेतकरी आवत्या टाकत असतात व रोवणी करण्यासाठी धान पऱ्हे टाकून रोपांची अपेक्षित वाढ झाल्यावर त्याची लागवड करीत असतात. सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली आहे. धूळ पेरणी केलेले पऱ्हे जमिनीतून बाहेर डोकावत आहेत. वरच्या पाण्यावर अवलंबून असलेले शेतकरी हलक्या धानाची लागवड करीत असतात, तर काही शेतकरी मध्यम व जड धानपिकांची लागवड करीत असतात. यासाठी मुखत्वे जयश्रीराम, जयप्रकाश, सोनम, सोनालिका, हिरा, वायएसआर, यासोबतच संकरित वाणाची लागवड करीत असतात.
बी-बियाणे यांच्या किमती दरवर्षी वाढत जात असतात. त्यामुळे पीक लागवड खर्च वाढत चालला आहे. मात्र, हमीभाव त्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे शेती हा व्यवसाय तोट्यात आला. सध्या शेती करणे परवडणारे नाही, तरीही एक व्यवसाय म्हणून शेतकरी शेती करतात. यासाठी शेतकरी दरवर्षी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून बॅंकाकडून कर्ज घेत असतात. काही शेतकरी कारभारणीचे दागिने गहान ठेवून पीक लागवड करीत असतात. या वर्षी शेतकऱ्यांना बोनस मिळाले नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन ढासळलेले आहे, तसेच वाढत्या महागाईच्या काळात शेती करणे शेतकऱ्यांना अडचणीचे जात आहे.