लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे प्रपंच चालविण्यासाठी अनेक महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आणि प्रसूतीनंतरही लगेच कामावर जावे लागते. अशा स्थितीत त्या महिलेचे आणि बाळाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी गरोदर आणि बाळंत महिलांना सकस आहारासाठी थेट आर्थिक लाभ दिला जात आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजना आणि जननी सुरक्षा योजनेतून यावर्षी १० कोटी ९५ लाखांची मदत संबंधित महिलांना करण्यात आली आहे.गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत काम करण्याची वेळ येऊ नये आणि आली तरी आरोग्य, आहार याची हेळसांड होऊ नये म्हणून हा प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा उद्देश आहे. आर्थिक अडचणीमुळे प्रसूतीनंतर शारीरिक क्षमता चांगली नसतानासुद्धा अनेक माता कामावर जातात. त्यामुळे बाळाचे योग्य पोषण न झाल्याने ते कुपोषित होते. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गरोदर व स्तनदा मातेस सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला आलेल्या नवजात बालकांचेही आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी मातृवंदना योजनेतून महिलेच्या बँक खात्यात तीन टप्प्यांत ५ हजार रुपये टाकले जातात. याशिवाय जननी सुरक्षा योजनेतून ५ हजार ७०० रुपये अतिरिक्त लाभ दिला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटच्या मासिक पाळीच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत सर्व कागदपत्रे जमा करणे आवश्यक असते. जिल्ह्याच्या दुर्गम भागात अनेक महिलांना याची माहितीच नसते; पण त्या भागातील आशा आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे या योजनेचे लाभार्थी वाढले आहेत. माता व बाल मृत्यूदर कमी करण्यास ही योजना कारणीभूत ठरली असल्याचे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. समीर बनसोडे यांनी सांगितले. पहिले बाळंतपण असणाऱ्या अधिकाधिक मातांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा कार्यक्रम समन्वयक अश्विनी मेंढे यांच्याशी संपर्क करून नोंदणी करावी.
क्यूआर कोड स्कॅनरचे वाटप जिल्ह्यातील प्रथम गरोदर व स्तनदा मातांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ४ मार्च २०२१ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांच्या हस्ते सर्व १२ तालुक्यांमध्ये क्यूआर कोड स्कॅनर मशीनचे वाटप करण्यात आले. या मशीनच्या आधारे लाभार्थीचे आधार कार्ड स्कॅन केले जाते. त्यामुळे योजनेचा लाभ मिळण्यास आणखीच सोईचे होईल, असे डॉ. शंभरकर यांनी सांगितले.
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याकरिता राज्यस्तरावरून २५ हजार ९६० महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात २६ हजार २८६ महिला गरोदर व स्तनदा मातांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात हे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. सर्व लाभार्थ्यांच्या बँक अथवा पोस्ट खात्यामध्ये १० कोटी ९५ लाखांची रक्कम जमा करण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.