धानाेरा : ‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या लेखा-मेंढा गावाला माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी रविवारी भेट देऊन ग्रामविकासाच्या विविध उपक्रमाची माहिती घेतली. तसेच त्यांनी गावातील तेल कांडप व चाराेळी प्रकल्पाला भेट दिली व गाववासीयांशी संवाद साधला.
महासंचालक पांढरपट्टे यांनी भेटीदरम्यान लेखा-मेंढाच्या सरपंच नंदा दुगा यांनी गावातील कामकाज व ग्रामसभेबद्दलची माहिती दिली. यावेळी सचिवांनी गावातील परिसर पाहिला तसेच गोटूलला भेट देऊन त्याठिकाणची प्रक्रिया समजून घेतली. गावातील तेल कांडप व चारोळी प्रकल्पास भेट देऊन कामाची माहिती घेतली. लेखा-मेंढा गावात झालेल्या कार्यक्रमाला सरपंचांसह ग्रामसभेचे अध्यक्ष अलीराम हिचामी, ग्रामसभा सचिव चरणदास तोफा, नरेश कुमोटी, मनिराम दुगा, आकांक्षित जिल्हा प्रतिनिधी सुधाकार गवंडगावे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. बैठकीच्या आदल्या दिवशी सचिवांनी आपला वाढदिवस धानोरा येथील अतिशय दुर्गम भागातून आलेल्या मुलींसाेबत साजरा केला. विशेष म्हणजे, डिसेंबर महिन्यात या शाळेची कोरोना काळातील घरपोच शिक्षण या विषयावरची यशस्वीगाथा राज्यस्तरावर पाठविण्यात आली होती. लेखा-मेंढा गावाच्या भेटीदरम्यान नागपूर व अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागुल, शिक्षणाधिकारी राजकुमार निकम यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, प्रवीण टाके, मनीषा सावळे, सचिन अडसूळ, अनिल गडेकर उपस्थित होते.