गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कैकाडी व तत्सम भटक्या, विमुक्त जमाती आढळून येतात. या जमातीतील शेकडो नागरिकांचा दारिद्र्य रेषेमध्ये समावेश आहे. त्यामुळे या समाजातील नागरिकांना घर बांधकामासाठी भूखंड व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
गोकुलनगरात घाण
गडचिरोली : येथील गोकुलनगरात नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी नियमितपणे कचरा उचलण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे परिणामी वाॅर्डामध्ये बहुतांश ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. या ठिकाणचा कचरा उचलला जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
कुरखेडा रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवा
कुरखेडा : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांची व्यवस्था आहे. या रुग्णालयात कुरखेडा, कोरची, देसाईगंज तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे १०० खाटांची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे, परंतु या मागणीकडे दुर्लक्षच आहे.
भामरागड तालुक्यातील गावांना विजेची प्रतीक्षा
भामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यातील अनेक गावात विजेचे खांब उभे करण्यात आले. त्यावर ताराही ओढण्यात आल्या. मात्र, यावर वीजपुरवठा सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे या भागातील नागरिक अद्यापही विजेच्या प्रतीक्षेत आहेत.
कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षण द्या
गडचिरोली : ऑनलाइन वेतन देयक तयार करण्यासाठी नेट कनेक्टिव्हिटीसोबतच संगणकाचे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. मात्र, अनेक शाळांमधील शिक्षक, तसेच लिपिकांना संगणकाचे परिपूर्ण ज्ञान नाही. शाळा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
वयोवृद्धांना पेन्शन द्या
आलापल्ली : जिल्ह्यात वयोवृद्ध ओबीसी शेतकरी व शेतमजुरांची संख्या मोठी असून, त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी ओबीसी प्रवर्गातील शेतकरी, शेतमजुरांना वयाच्या ६० वर्षांनंतर प्रतिमहिना तीन हजार रुपये वृद्धापकालीन अर्थसाहाय्य पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
कर्जापासून युवा वंचित
देसाईगंज : केंद्र शासनाने उद्योगांना कर्जाचा पुरवठा करण्यासाठी मुद्रा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास सव्वादोन हजार उद्योजकांना २१ कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. शेकडो युवकांचे अर्ज बँकेमध्ये पडून आहेत. प्रशासकीय यंत्रणेने या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली नाही.
वाढीव टाकीचा अभाव
चामोर्शी : चामोर्शी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आणखी एका पाणी टाकींचे बांधकाम करण्याची गरज आहे. नगरपंचायतीने याबाबत हालचाली कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. चामोर्शी शहरातील काही वॉर्डांना अतिशय कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे वाढीव टाकी आवश्यक आहे.
कोरचीतील रस्ते खड्डेमय
कोरची : तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावर गवत उगवले आहे. गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी आहे. खड्ड्यांमुळे अपघात हाेण्याची शक्यता बळावली आहे.
बाजारात स्वच्छतागृह द्या
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौक शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरात कुठेही जाण्यासाठी इंदिरा गांधी चौकातूनच मार्गक्रमण करावे लागते. अनेक नागरिक चौक परिसरात विसावा घेतात. नागरिकांना मुतारीसाठी नाहक त्रास सहन करावा लागतात. या ठिकाणी स्वच्छतागृह निर्माण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वाकलेले खांब ‘जैसे थे’
आरमोरी : तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक विद्युत खांबे वाकलेले आहेत. त्यामुळे सदर खांबांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. अनेक दिवसांपासून खांब वाकलेल्या अवस्थेत असल्याने अपघात होऊ शकतो. याबाबत वीज वितरण कंपनीकडे अनेक वेळा तक्रार करण्यात आली. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे.
रस्ते खड्डेमय
गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. सदर रस्ते दुरुस्त करावे, त्याचबरोबर नाल्या साफ कराव्या, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे. मोहझरी गावातील मुख्य मार्ग डांबरीकरणाने बनला आहे.
मुख्यालय सक्तीचे करा
धानोरा : धानोरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील, तसेच आरमोरी, देसाईगंज, आरमोरी, कोरची व कुरखेडा तालुक्याच्या दुर्गम भागात कार्यरत व दररोज अपडाऊन करत आहेत. हे कर्मचारी दुर्गम भागात राहातच नसल्यामुळे ते कार्यालयात नियमित हजर राहात नाहीत.
रांगीमार्गे अवैध वाहतूक
चातगाव : चातगाव रांगीमार्गे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची सुविधा नसल्याने, प्रवाशांना खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे. खासगी वाहनाने वाहतूक होत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. या भागात उपप्रादेशिक परिवहन विभागाने तपासणी मोहीम सुरू करण्याची आवश्यकता आहे.