आरोग्य धोक्यात : विहिरीची दुरूस्ती नाहीलोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : तीन महिन्यापूर्वी उन्हाळ्यात पाणी टंचाई निवारण्यासाठी वैरागड ग्रामपंचायत प्रशासनाने नदी पात्रात जेसीबीच्या सहाय्याने खड्डा तयार केला. या खड्ड्यातील पाणी नळ योजनेच्या विहिरीत टाकण्याचे नियोजन केले. याकरिता नदी पात्रातील खड्ड्यापासून विहिरीपर्यंत पाईप टाकण्यासाठी नळ योजनेच्या विहिरीला छिद्र पाडण्यात आला. मात्र सदर छिद्र बुजविण्यात आला नाही. त्यामुळे जलशुध्दीकरण केंद्राची व्यवस्था या योजनेत नाही. नदी पात्रातील गढूळ पाणी विहिरीत जात आहे. परिणामी वैरागड येथे नळाद्वारे गढूळ पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.मे २०१७ मध्ये नदी पात्रात खड्डा तयार करण्यासाठी ७५ हजार रूपयांचा खर्च झाला. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. संपूर्ण उन्हाळ्यात नळाला पाणी आले नाही. आता पावसाळ्यात नळाद्वारे पाणी पुरवठा होत आहे. मात्र हे पाणी अशुध्द व गढूळ आहे. भांड्यात हे पाणी घेतल्यास खालच्या भागात जाड थर बसतो. सर्वसामान्य कुटुंबात पाणी शुध्दीकरणाची उपकरणे नसल्याने सदर पाणी पिल्याने जलजन्य आजार बळावण्याची शक्यता आहे. नळ योजनेच्या विहिरीची देखभाल व दुरूस्तीकरिता ग्रामीण पाणी पुरवठा योजनेतून मे २०१७ मध्ये ३४ हजार १९० रूपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र विहिरीची दुरूस्ती झाली नाही. वैरागड ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्राम विकास अधिकारी ए. एन. डाखरे यांनी ९८ हजाराच्या भूखंड फेरफार निधीत आर्थिक गैरव्यवहार केल्याने फेब्रुवारी महिन्यात त्यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्या कार्यकाळात पाणी पुरवठा योजनेच्या निधीत मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप ग्रामसभेत करण्यात आला होता.
वैरागडात नळाद्वारे गढूळ पाणी पुरवठा
By admin | Published: July 17, 2017 12:58 AM