साधी सायकलही मिळाली नाही : शासकीय योजनेच्या लाभापासून वंचितजिमलगट्टा : समाजातील निराधार, अपंग असलेल्या लोकांना शासनाकडून योजनांचा लाभ दिला जातो. परंतु अहेरी तालुक्यातील मरपल्ली येथील आजन्म अपंग असलेल्या शंकर नानाजी दुर्गम (५०) व त्यांची पत्नी चिनक्का शंकर दुर्गम (४५) शासनाच्या लाभापासून वंचित आहेत. साधी चारचाकी सायकलही त्यांना आजवर शासनाकडून मिळाली नाही.शंकर दुर्गम हे जन्मताच दोन्ही पायांनी अपंग आहेत. तर त्यांची पत्नी चिनक्का दुर्गम या जन्मताच एका पायाने अपंग आहे. परंतु आता त्यांना दोन्ही पायांनी अपंगत्व आले आहे. दुर्गम दाम्पत्याला जमिनीवरून हाताच्या सहाय्याने चालावे लागते. शंकर दुर्गम शिंपी व्यवसाय करीत होते. परंतु आता वाढत्या वयानुसार श्रम करणे शक्य नसल्याने त्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. दुर्गम यांना तीन मुली, एक मुलगा असून मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुर्गम दाम्पत्य जन्मताच अपंग असल्याने त्यांना शासनाने योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी दुर्गम कुटुंबीय व नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)
अपंग दुर्गम दाम्पत्याचा जीवनसंघर्ष
By admin | Published: August 14, 2015 1:39 AM