दिगांबर जवादे, गडचिराेली : भंडारा जिल्ह्यातील गाेसेखूर्द धरणाचे सर्वच ३३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून नदीत १० हजार ४७ क्युमेक्स एवढे पाणी साेडले जात आहे. त्यामुळे गडचिराेली जिल्ह्यात पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. विषेश म्हणजे याच आठवड्यातील हा दुसरा पूर राहणार आहे.
नागपूर व मध्यप्रदेशात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गाेसेखूर्द धरणात येणाऱ्या पाण्याचा येवा वाढला आहे. गाेसेखूर्द हे वैनगंगा नदीवरील मुख्य धरण आहे. या धरणाचे पाणी साेडले की, याचा थेट परिणाम गडचिराेली जिल्ह्यात दिसून येते. या धरणाचा गडचिराेली जिल्हावासीयांना काहीच फायदा नसला तरी दुष्परिणाम मात्र भाेगावे लागतात.
जिल्ह्यात फारसा पाऊस नाही. मात्र गाेसेखूर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. आठ दिवसांपूर्वीच पुरामुळे शेकडाे हेक्टवरील पिके नष्ट झाली. त्यातून सावरत नाही तर पुन्हा पाणी साेडले जात आहे. त्यामुळे पुन्हा पूर स्थिती निर्माण हाेणार आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुरामुळे खर्चही भरून निघणे कठीण असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.