आरमोरी : वनविभागामार्फत नागरिकांना, तसेच वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना अनुदानावर गॅस सिलिंडर कनेक्शन देण्यात आले आहे. मात्र, संपल्यानंतर सिलिंडर भरण्यासाठी लांब अंतराच्या गावांकडे जावे लागते. गॅस सिलिंडर रिफिलिंग ठिकाणाचे योग्य नियोजन नसल्याने या योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे.
खरपुंडी मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी
गडचिरोली : खरपुंडी मार्गावर डम्पिंग यार्डपर्यंत वीजतारा टाकून खांब गाडण्यात आले आहेत. मात्र, या मार्गावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाहीत. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी खरपुंडी मार्गावर जातात. या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी आहे.
सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा
आष्टी : विद्युत वाचविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र, यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यामुळे नव्याने बॅटऱ्या द्याव्यात, अशी मागणी आहे.
दिना धरणाचे खोलीकरण करा
चामोर्शी : जिल्ह्यातील सर्वांत मोठा सिंचन प्रकल्प म्हणून दिना प्रकल्पाची ओळख आहे. अनेक वर्षांपासून उपसा करण्यात आला नाही. त्यामुळे जलसाठवणूक क्षमता कमी झाली आहे. तलावाचा उपसा व कालवे दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी आहे.
मार्गावरील खड्ड्यांमुळे रहदारीस अडथळा
गडचिरोली : शहरातील मुख्य मार्गावर, तसेच अंतर्गत मार्गावर काही नागरिक फलक लावण्यासाठी मार्गावर खड्डा खोदतात. नंतर खड्डा तसाच ठेवला जातो. परिणामी, अपघात होण्याची शक्यता आहे. खड्डे खोदणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
भामरागड तालुक्यातील गावांना विजेची प्रतीक्षा
भामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यातील अनेक गावांत विजेचे खांब उभे करण्यात आले. त्यावर ताराही ओढण्यात आल्या. मात्र, यावर वीजपुरवठा सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे नागरिक अद्यापही विजेच्या प्रतीक्षेत आहेत.
तलावांच्या दुरुस्तीमुळे सिंचन वाढले
सिरोंचा : तालुक्यातील मामा तलावाच्या माध्यमातून धान पिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. येथील बहुतांश तलाव जीर्णावस्थेत पोहोचले होते. त्यामुळे त्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. ही बाब लक्षात घेऊन शासनाने मामा तलाव व कालव्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. मामा तलावांचे दुरुस्ती झाल्याने सिंचनाचे क्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे.
रस्त्यालगत वाहनांवर कारवाई करा
गडचिरोली : गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात अगदी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने उभी केली जातात. सदर वाहनांवर कारवाई होत नसल्याने रस्त्यात वाहन उभे करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनांवर कारवाई करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.
अनावश्यक फलकाने साैंदर्यीकरणात बाधा
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात अनेक अनावश्यक बॅनर्स, फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे चौकातील सौंदर्यीकरणाला बाधा येत आहे. त्यामुळे सदर फलक हटविण्याची मागणी आहे. बॅनर्समुळे चौकाच्या सौंदर्यीकरणात बाधा येत आहे.
घोट-रेखेगाव मार्ग उखडला
घोट : परिसरातील घोट-रेखेगाव मार्गाची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. घोट हे मोठे गाव असल्याने या गावाला रेखेगाव येथील नागरिक विविध कामांसाठी येतात. सदर मार्ग खराब असल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे.
भेंडाळा बस स्थानकावर गतिरोधकाचा अभाव
चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर असलेल्या भेंडाळा येथील बस स्थानकावर गतिरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. चामोर्शी-मूलमार्गे, तसेच आष्टीकडे जाणारी शेकडो वाहने भरधाव वेगाने जातात. बस स्थानकावर प्रवासी व विद्यार्थ्यांची नेहमीच गर्दी राहते. गतिरोधक नसल्याने वाहनांचा वेग कमी केला जात नाही.
जि.प. कॉलनीतील घरांची दुरुस्ती करा
गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी ५०० घरांची स्वतंत्र कॉलनी वसविण्यात आली आहे. या कॉलनीतील घरांची दुरवस्था आहे.
कुटुंब नियोजनात महिलाच आघाडीवर
गडचिरोली : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले, तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजना महिला आघाडीवर आहेत.
कनेरी, नागेपल्ली दूध शीतकरण केंद्र बंदच
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नागेपल्ली व कनेरी येथे राज्य शासनाचे दूध शीतकरण केंद्र आहे. मात्र, दुधाचे पुरेसे उत्पादन जिल्ह्यात नसल्याने सदर शीतकरण केंद्र सध्या बंद आहे. नव्या सरकारने दुग्ध व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करून शीतकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
जिल्ह्यात अपुरी अग्निशमन व्यवस्था
अहेरी : १० लाख लोकसंख्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुक्यांमध्ये १,६४८ गावे आहेत. घटनांच्या वेळी मदतीला धावून जाणारे केवळ चार अग्निशमन वाहन जिल्ह्यात आहेत. प्रत्येक तहसीलला अग्निशमन यंत्र उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. याकडे लक्ष देऊन नगर पंचायतींना निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
खुल्या जागांची दैनावस्था कायम
गडचिरोली : गडचिरोली नगरपालिका क्षेत्रात अनेक वॉर्डांमध्ये खुल्या जागा आहेत. मात्र, काही मोजक्याच जागांना संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या खुल्या जागांना संरक्षण भिंत नाही. तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. न. प. प्रशासनाने शहरातील सर्वच ओपन स्पेसचा विकास करावा, अशी मागणी होत आहे.
ग्रामीण भागातील गोदरीमुक्तीवर प्रश्नचिन्ह
विसोरा : बहुतांश नागरिकांकडे शौचालय आहे. मात्र, ग्रामीण भागातील नागरिक शौचालयाचा वापरच करीत नाही. परिणामी, शौचालय बेकामी झाले आहेत. शौचालयाचा वापर न झाल्याने हगणदारीमुक्त गाव निर्माण करणे अडचणीचे झाले आहे.
कैकाडी वस्तीत सुविधांचा अभाव
गडचिरोली : शहरालगत चामोर्शी मार्गावर कैकाडी समाजबांधवांची वस्ती आहे. या ठिकाणी अनेक झोपड्या आहेत. मात्र, येथील नागरिक पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. कैकाडी वस्तीतील नागरिक प्रत्येक निवडणुकीत मतदान करतात. मात्र, त्यांना नागरी सुविधा मिळत नाहीत.
अल्पवयीन चालकांवर कारवाई करा
आरमोरी : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालवली जात आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, भरधाव वेगाने अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सिरोंचा तालुक्यातील बस थांब्याची दुरवस्था
सिरोंचा : अहेरी ते गडचिरोली आगारातून सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात बस सोडल्या जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे बांधण्यात आली आहेत. मात्र, प्रवासी निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले असल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. बऱ्याच प्रवासी निवाऱ्यांचे टिनपत्रे वादळाने उडाली आहेत. भिंती पिचकारीने रंगल्या असून घाणीचे साम्राज्य आहे.
अहेरी शहरातील अतिक्रमण काढा
अहेरी : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने सदर अतिक्रमण तात्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यापूर्वीही अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र दुर्लक्षच झाले आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाकडून अतिक्रमणधारकांवर कारवाई होताना दिसून येत नाही.
ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
कुरखेडा : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आले असले तरी ग्रामीण भागातील अनेक गावातील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही. त्यामुळे अंत्यसंस्करासाठी अनेक अडचणी येतात.
आलापल्ली-मार्कंडा रस्त्यावर खड्डे
आलापल्ली : मुलचेरा ते मार्कंडा (कं), आलापल्ली ते मुलचेरा व कोपरअल्ली ते घोट मार्गाची अत्यंत दैनावस्था झाली असून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा त्रास वाहनधारक व शाळकरी मुलांना करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ठेंगण्या व अरुंद पुलाचा प्रश्न कायमच
गडचिरोली : ब्रिटिश काळात बांधलेला एकही पूल गडचिरोली जिल्ह्यात नसला तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर तयार करण्यात आलेला चंद्रपूर-आलापल्ली मार्गावरील आष्टीचा पूल ठेंगणा व अरुंद असल्यामुळे या पुलावरून आजवर अनेकांचा वाहन कोसळून बळी गेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ठेंगणे व अरुंद पूल हे वाहतुकीसाठी ग्रामीण भागात नेहमीच अडचणीचे ठरलेले आहेत. या समस्येकडे दुर्लक्ष हाेत आहे.