लाेकमत न्यूज नेटवर्कआष्टी : जिल्ह्यात छत्तीसगडमार्गे दाखल झालेल्या २१ जंगली हत्तींच्या कळपासाठी चपराळा अभयारण्यात पुरेसे खाद्य मिळणार नाही. त्यांच्यासाठी भामरागड किंवा सिरोंचा परिसरातील जंगल अधिक पोषक राहू शकते. असे असले तरी चपराळातही गवत, पाणी अशा सुविधा वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी भूमिका घेऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी यावर चर्चा केली. राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात चपराळा येथील वन विभागाच्या विश्रामगृहावर आढावा घेतला. जिल्ह्यात मागील महिनाभरापासून जंगली हत्तींचे वास्तव्य आहे. या हत्तींकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये, तसेच हत्तींना आवश्यक वातावरण असलेली जागा तयार करण्याच्या अनुषंगाने चपराळा येथील अभयारण्याचा विचार होऊ शकतो का? याबाबतची पडताळणी वन विभाग व प्रशासनाकडून करण्यात आली. चपराळा येथे हत्तींच्या नैसर्गिक निवासाबाबत जागा तयार करावयाची असल्यास काय-काय उपाययोजना कराव्या लागतील, याबाबतचे पॉवर पॉईंट सादरीकरण पालकमंत्र्यांसमोर गडचिरोलीचे उपवनसंरक्षक एस. आर. कुमारस्वामी यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, एएसपी अनुज तारे, आलापल्लीचे उपवनसंरक्षक सी. आर. तांबे, उपविभागीय वन अधिकारी राहुल शितोलिया, चौडमपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश लांडगे, क्षेत्र सहायक एम. पोतगंटावार व वन विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी वन विभागाने हत्तींच्या वास्तव्याचा सविस्तर अभ्यास करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी शिवसेनेचे किशाेर पाेतदार व सुरेंद्रसिंह चंदेल उपस्थित हाेते.
हत्तींची दिवसा भटकंती, रात्री आराम- वनसंरक्षक किशोर मानकर यांनी यावेळी हत्तींबाबतची सद्यस्थिती सांगितली. सध्या तो कळप धानोरा तालुक्यातील जंगलात सुरक्षित आहे. या कळपात पिलूही असल्यामुळे कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास हे हत्ती आक्रमक होतात, असे सांगितले. हे सर्व हत्ती सकाळी ७.३० वाजता जंगलात निघून जाऊन सायंकाळी ६ च्या सुमारास परत येत आहेत. त्यांना जंगलातील तलावामध्ये पाण्याची सोयही असल्यामुळे त्याठिकाणी त्यांचा मुक्काम आहे. परंतु, उन्हाळ्यात त्याठिकाणी हत्तींना पाणी मिळणार नसल्यामुळे ते खालच्या भागात भामरागडकडे जाऊ शकतात, अशी माहिती यावेळी पालकमंत्र्यांना देण्यात आली.