गडचिरोली : १९९२ मध्ये गडचिरोली जिल्हा राज्य शासनाने दारूबंदी म्हणून घोषित केला आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदीची सक्तीची अंमलबजावणी करणारी यंत्रणा सफशेल फेल ठरल्याने अवैध दारूविक्री गावागावात कुटीर उद्योग झाला आहे. आता राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात येत्या दोन महिन्यात दारूबंदी केली जाईल, अशी घोषणा केली आहे. मुनगंटीवारांच्या या घोषणेची सध्या जिल्हाभर जोरदार चर्चा सुरू आहे.२६ आॅगस्ट १९८२ ला निर्माण झालेला गडचिरोली जिल्हा दारूबंदी जिल्हा असला तरी येथे गावागावात राजरोसपणे दारू विकल्या जात आहे. या अवैध दारू व्यवसायात पाच हजारावर महिला, पुरूष, युवक काम करीत आहे. दारूची विक्री प्रचंड प्रमाणात वाढल्याने ग्रामीण भागात शेतीला मजूर मिळणे कठीण झाले आहे. अत्यंत कमी मेहनतीत दिवसाला २०० ते ३०० रूपयाची रोजी अवैध दारूविक्रीतून मिळत असल्याने जत्थेचे जत्थे या कामात लागलेले आहेत. जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये ब्रॅन्डेड कंपनीची बनावटी दारू बनविण्याचे कारखानेही पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. त्यातच चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्याच्या सीमेला लागून गडचिरोली जिल्ह्याला ३० परवानाप्राप्त दारू दुकानांचा वेढा आहे. आष्टी, व्याहाड, गांगलवाडी, लाखांदूर या भागात मोठ्या प्रमाणावर परवानाप्राप्त दुकाने व बीअर शॉपी सुरू आहे. राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केल्यास गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील हे दारूचे दुकान बंद होतील. मात्र गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर पुन्हा नवे दुकान थाटले जातील. छत्तीसगड राज्याच्या सीमेवर तसेच तेलंगणा राज्याच्या सीमेवरही दारूचा मोठा व्यापार चालतो. गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी पूर्णत: फसलेली आहे. अवैध दारू पिऊन आजाराचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पोटाच्या आजाराने मृत्यू झालेल्यांची संख्या गेल्या वर्षभरात १०० वर अधिक असल्याचे वैद्यकीय सुत्रांचे म्हणणे आहे. एकूणच चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होते काय, याकडे चंद्रपुरकरांचे जेवढे लक्ष आहे, त्यापेक्षा अधिक लक्ष गडचिरोली जिल्ह्यातील जनतेचे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
चंद्रपुरातील दारूबंदीच्या निर्णयाची गडचिरोलीतही चर्चा
By admin | Published: November 08, 2014 10:37 PM