देसाईगंज नगर परिषदेचे वार्षिक आर्थिक बजेट कोट्यवधी रुपयांचे आहे. याअंतर्गत काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून शहराच्या मुख्य चौकात फव्वारा लावण्यात आला. यासाठी विहीर खोदून तेथे मोटारपंप बसवून फव्वाऱ्याचे अधिक सुशोभिकरण करण्यासाठी रंगीबेरंगी लाईट लावण्यात आले. मात्र सदर फव्वारा मागील अनेक वर्षांपासून बंदच असल्याने केलेल्या खर्चावर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. विशेष म्हणजे, फव्वारा चौकाच्या सभोवताल किरकोळ दुकानदार आपापली दुकानदारी थाटून आहेत. याच नादात त्यांनी चौकच गिळंकृत केला आहे. असे असले तरी पालिका प्रशासन याकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. गडचिरोली जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या देसाईगंज शहराच्या मुख्य चौकात लावण्यात आलेला फव्वारा एकेकाळी शहराच्या सौंदर्यात भर टाकणारा असला तरी सदर फव्वाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे यावर खर्च केलेले लाखाे रुपये वाया गेले की काय? असा सवाल नागरिक करीत आहेत. सध्या फव्वारा अखेरच्या घटका मोजत आहे. पालिका प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन फव्वारा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी शहरवासिय करीत आहेत.
बाॅक्स
व्यावसायिकच टाकतात कचरा
फव्वारा चाैकात दुकाने लावणारे व्यावसायिकच येथे कचरा टाकत असल्याने सभाेवताल कचरा दिसून येताे. तसेच याठिकाणी वाढलेल्या झाडाझुडपांनी फव्वारा मशीनही कवेत घेतल्याने अस्वच्छतेत भर पडली आहे. शहरात सद्य:स्थितीत मोठ्या प्रमाणात शासकीय बांधकामे, विद्युतीकरण करण्यावर भर देण्यात येत असले तरी शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या मुख्य चौकातील फव्वाऱ्याचे पुनर्जीवित करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. फव्वारा चाैकात कचरा टाकणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.