सुसंगत गाव प्रकल्पाची अंमलबजावणी : आदिवासी विकास विभागाचा पुढाकारलोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : आदिवासी विकास विभागामार्फत अहेरी व एटापल्ली या दोन तालुक्यातील २० गावांमध्ये सुरू असलेल्या हवामान सुसंगत गाव प्रकल्पाच्या माध्यमातून पाच शेतकरी गटांना भात लावणी यंत्र, स्प्रेपंप व ब्रश कटर आदी कृषी साहित्य वाटप करण्यात आले. आलापल्ली येथे आयोजित कृषी औजारे वाटप कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी लाटकर, मोरे, पडघम, मट्टाजी, शर्मा, अहेरीचे तहसीलदार घोरडे, बिसा संस्थेचे अधिकारी डॉ. प्रकाश नाईक, डॉ. प्रसून, प्रफुल राऊत, कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचे आशिष नाफडे, मिलिंद कांबळे, सागर मंचलवार, अंकूर जोतीशी आदी मान्यवर उपस्थित होते.पारंपारिक शेतीवरून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावे, जेणेकरून शेतीचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल या हेतूने अहेरी व एटापल्ली तालुक्याच्या २० गावातील पाच शेतकरी गटांना कृषी औजारे संच वितरित करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला २० गावातील जवळपास ३०० आदिवासी शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रकाश नाईक, संचालक मिलिंद कांबळे यांनी केले तर आभार आशिष नाफडे यांनी मानले. याप्रसंगी आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सुसंगत गाव प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रबी हंगामात गहू व चना पिकाचे बियाणे वितरित केली जातात.
पाच शेतकरी गटांना कृषी साहित्य वाटप
By admin | Published: June 12, 2017 12:56 AM