लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीने आरमोरीजवळील शिवणी येथे ठेवलेल्या फ्रिजवाल गाई शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर सदर गायी ताब्यात घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या चकरा सुरू झाल्या. दरम्यान यादीतील शेतकऱ्यांची नावे जास्त आणि प्रत्यक्ष गायींची संख्या मात्र कमी, अशी स्थिती असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांची बैठक घेतली. त्यात टोकन पद्धतीने गाईंचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. एवढेच नाही तर लागलीच गाईंचे वाटपही सुरू करण्यात आले.शेतकºयांना वाटप करण्यासाठी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीने आणलेल्या लष्कराच्या दुधाळू गाई दोन महिन्यापेक्षा जास्त काळ आपल्याच ताब्यात ठेवून शेतकºयांची आणि प्रशासनाची दिशाभूल केल्याची बाब लोकमतने उघडकीस आणली. त्यामुळे कंपनीचे भागधारक म्हणून दाखविलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या गाई ताब्यात घेण्यासाठी शिवणी येथील फ्रिजवाल गाईंच्या फार्मवर गर्दी करणे सुरू केले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनीही सदर गाईंवर संबंधित शेतकऱ्यांचाच हक्क असल्याचे शनिवारच्या बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे वाहतूक खर्च म्हणून प्रतिगाय ५ हजार रुपये प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीला देऊन गायी नेण्यासंबंधी पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांकडून हमीपत्र लिहून घेतले. परंतु या सर्व प्रक्रियेनंतर अवघ्या दोन दिवसात सदर गाईंपैकी १०० पेक्षा जास्त गाई गायब झाल्याने एकच खळबळ उडाली.सदर कंपनीने या गाई शेतकऱ्यांना देण्याऐवजी परस्पर विकल्याचा आरोप करीत शेतकºयांनी मंगळवारी शिवणी येथे धडक दिली. त्यावेळी तिथे मोठी विदारक परिस्थिती होती. अनेक गाई मरणासन्न अवस्थेत होत्या तर काही मरून पडल्या होत्या. विशेष म्हणजे ४०० पेक्षा जास्त गाई पुण्यावरून आणल्या असताना प्रत्यक्षात तिथे जेमतेम १०६ गाई असल्यामुळे शेतकºयांनी एकच हंगामा सुरू केला. याची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी तिकडे धाव घेतली. यादरम्यान कुरखेडा तालुक्याच्या दौऱ्यांवर असलेले आमदार कृष्णा गजबे हेसुद्धा सर्व कार्यक्रम बाजुला सारून शिवणीत दाखल झाले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आमच्या गाई आम्हाला द्या, अशी मागणी करीत रोष व्यक्त केला. मात्र आमदार कृष्णा गजबे यांनी त्यांची समजूत काढत शेतकºयांवर अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिली. तसेच शेतकºयांच्या प्रतिनिधींना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकाऱ्यांनी आ.गजबे यांच्यासह अधिकारी आणि शेतकºयांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन आजच्या आज टोकन पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करून गायींचे वाटप करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे लगेच पशुसंवर्धन उपायुक्त वाय.एस.वंजारी यांच्यासह इतर अधिकाºयांनी शिवणीत जाऊन गायींचे वाटप केले. संध्याकाळपर्यंत हे काम सुरूच होते. काही शेतकऱ्यांनी गाईंची स्थिती पाहून गाय स्वीकारण्यास नकार दिला. त्या गायी गौशाळेस दान देण्याचा निर्णय घेण्यात आला.शेतकºयांची फसवणूक सहन करणार नाहीशेतकºयांना शेतीपुरक व्यवसाय मिळावा आणि दुग्ध उत्पादन वाढावे या चांगल्या हेतूने वळू माता संगोपन केंद्र सुरू केले. मात्र प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीने शेतकऱ्यांना अंधारात ठेवून त्यांची एक प्रकारे फसवणूक केली. ही फसवणूक सहन करणार नाही. या प्रकरणात ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ केले जाईल, अशी ग्वाही आमदार कृष्णा गजबे यांनी शेतकºयांना दिली.गाई परत न आणल्यास कारवाईप्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीने आणलेल्या १०० पेक्षा जास्त गाई योग्य देखभालीअभावी मरण पावल्या तर १०० पेक्षा जास्त गाई परस्पर विकल्याचा आरोप होत आहे. सदर गाईंवर शेतकऱ्यांचा हक्क असल्यामुळे त्या गाई कंपनीच्या संचालकांनी परत आणून द्याव्या, अन्यथा त्यांच्याविरूद्ध कारवाई करावी, अशी भूमिका आ.गजबे यांनी घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचे समर्थक करत दोन दिवसांची मुदत दिली.
टोकन पद्धतीने शेतकऱ्यांना गाईंचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 5:00 AM
शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर सदर गायी ताब्यात घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या चकरा सुरू झाल्या. दरम्यान यादीतील शेतकऱ्यांची नावे जास्त आणि प्रत्यक्ष गायींची संख्या मात्र कमी, अशी स्थिती असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांची बैठक घेतली. त्यात टोकन पद्धतीने गाईंचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. एवढेच नाही तर लागलीच गाईंचे वाटपही सुरू करण्यात आले.
ठळक मुद्देआमदार गजबेंसह अधिकाऱ्यांची उपस्थिती : १०० वर फ्रिजवाल गाई झाल्या गायब