आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेच्या माध्यमातून कोराेनामुक्त गाव अभियानाची सुरुवात कोरची तालुक्यात करण्यात आले. ३५ गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्याचे ठरवले असून या प्रकल्पाचे उद्घाटन पंचायत समिती कोरची येथे १७ जून गुरुवारला संवर्ग विकास अधिकारी देवीदास देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कोरची तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी, संस्थेचे संयोजक डॉ. सतीश गोगुलवार, महा ग्रामसभा अध्यक्ष झाडूराम हलामी, राजाराम नैताम, कुमारी जमकातन, डाॅ. नरेंद्र खोबा, महेश लाडे व आशा सेविका उपस्थित होती. संवर्ग विकास अधिकारी देवरे यांनी उपस्थितांना कोरोनामुक्त गाव करण्यासाठी मार्गदर्शन केले तसेच गावात १०० टक्के लसीकरण करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे, असे सांगितले.
या प्रकल्पाचे मुख्य उद्देश म्हणजे लसीकरण शिबिर आयोजित करण्यास सहायता करणे, कोराेनामुक्त गाव समितीची स्थापना करून कोरोनामुक्त गाव समिती प्रशिक्षण करणे, आशा कार्यकर्ती ऑक्सिमीटर व थर्मामीटर गन, मास्क, साॅनिटायझर याचे वितरण करणे, आशा कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, आरोग्य विभाग शासकीय यंत्रणा यांच्यासोबत नियोजन बैठक लसीकरणासाठी लोकांना तयार करणे एकंदरीत गाव पातळीवर जाणीव जागृती करणे आदी आहेत.