जिमलगट्टा : अतिदुर्गम भागातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस विभागामार्फत अनेक योजना राबविल्या जात आहेत. या अंतर्गत उप पोलीस स्टेशन देचलीपेठा येथे १३ जुलै राेजी कृषी मेळाव्याचे आयोजन करून विविध योजनांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड होते. यावेळी कृषी सहायक ज्योती आत्राम, मंडळ अधिकारी नारायण सिडाम, ग्रामसेवक विनाेद कुमरे, तलाठी भाऊराव कन्नाके, पेठा आश्रमशाळेचे मुख्याध्यापक गणपती देशमुख व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. एसडीपीओ राहुल गायकवाड यांनी पाेलीस दादालोरा खिडकीचे महत्त्व पटवून दिले. मेळाव्यात शेतकऱ्यांना अनुदानावर धान बियाणे व विविध झाडांची रोपटी वितरित करण्यात आली. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी यांच्या वतीने पेठा आश्रमशाळेच्या शिक्षकांनी खावटी अनुदान योजनेंतर्गत अन्नधान्याचे किट वाटप केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देचलीपेठा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुधीर साठे, पोलीस उपनिरीक्षक गोमेद पाटील, भारत वर्मा, गणेश तायडे तसेच कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
बाॅक्स
सिंधावासीयांना बऱ्याच वर्षांनी मिळाले प्रमाणपत्र
देचलीपेठा परिसरातील सिंधा गावातील अनेक लोकांना जात प्रमाणपत्र बऱ्याच वर्षांपासून मिळाले नव्हते. याची दखल घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड व प्रभारी अधिकारी सुधीर साठे यांनी वारंवार पाठपुरावा करून जात प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले. विशेष म्हणजे, दुर्गम भागातील नागरिकांची विविध कागदपत्रे गाेळा करण्याचे काम पाेलीस कर्मचाऱ्यांनी केले. जात प्रमाणपत्र मिळाल्याने सिंधा गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.