शासन आपल्या दारी : कबड्डी, व्हॉलिबॉल स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस आष्टी : पोलीस विभागाच्या वतीने रामनगट्टा येथे मंगळवारी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. समाजमंदिरात पार पडलेल्या या मेळाव्यात ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेतून विविध विभागामार्फत शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. सोबतच नागरिकांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर गावातील होतकरू विद्यार्थ्याला सायकल भेट देण्यात आली. तसेच उपस्थित नागरिकांना ब्लॅकेट वितरित करण्यात आले. दरम्यान परिसरातील युवकांसाठी कबड्डी, व्हॉलिबॉल स्पर्धा व पारंपरिक गोंडी नृत्याचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या स्पर्धकांना क्रीडा साहित्य व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच रामनगट्टा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. मेळाव्यात आरोग्य, वन विभाग, महसूल आणि पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच सर्वसामान्य आदिवासी जनतेच्या विकासासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला आष्टीचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे, सहायक पोलीस निरीक्षक मंडलवार, सरपंच कीर्ति पेंदाम, माला डोर्लीकर, कुमरे, पीएसआय गोहणे, संदीप कापडे, संदीप शिंगटे, विजय जगदाळे, धर्मराव उरेते, दिवाकर दुम्मनवार, अशोक शेंडे, विनोद तंगडपल्लीवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जनजागरण मेळाव्यात साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2017 1:32 AM