गडचिरोली : शेतीतील मजुरांच्या समस्येला तोंड देण्याबरोबरच शेतीचे यांत्रिकीकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हाभरातील शेतकर्यांच्या ३७ गटांना रोवणी यंत्राचा पुरवठा करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाचे उत्पादन सर्वात जास्त घेतले जाते. या पिकाची रोवणी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात मजुरांची गरज भासते. मात्र सर्वच शेतकरी एकाच वेळी रोवणीच्या कामाला सुरूवात करीत असल्याने मजुरांची फार मोठी समस्या निर्माण होत असल्याचा शेतकर्यांचा दरवर्षीचा अनुभव आहे. मजुरांअभावी रोवणीचे काम लांबत असल्याने उत्पादन घट होत होती. मजुरांची समस्या सोडविण्यासाठी आदिवासी विकास विभाग व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. मानव विकास मिशनअंतर्गत ३७ शेतकरी गटांना रोवणी यंत्राचा पुरवठा केला आहे. सदर रोवणी यंत्र एका दिवशी किमान दोन ते अडीच एकर शेतात रोवणी करीत असल्याने रोवणीचे काम तत्काळ आटोपून उत्पादन वाढीस मदत होणार आहे. याच बरोबर या शेतकर्यांना पॉवर टीलर, भात कापणी यंत्रा, कोनोविडर, युरीया ब्रिकेट अप्लीकेटर ही यंत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये ४६४ शेतकरी प्रत्यक्ष सहभागी आहेत. गडचिरोली तालुक्यातील ५९ शेतकरी, चामोर्शी तालुक्यातील ५४, मुलचेरा ६५, धानोरा १५, आरमोरी ८१, कुरखेडा ६६, कोरची ५0, अहेरी १६, भामरागड १५, सिरोंचा १0, एटापल्ली तालुक्यातील २३ शेतकर्यांचा समावेश आहे. या शेतकर्यांच्या गटांना यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी कृषी सभापती अतुल गण्यारपवार व कृषी विकास अधिकारी विजय कोळेकर यांनी विशेष सहकार्य केले आहे. (नगर प्रतिनिधी)
३७ शेतकरी गटांना रोवणी यंत्राचे वाटप
By admin | Published: May 27, 2014 11:41 PM