दीपक आत्राम यांची मागणी : मेडिगट्टा-कालेश्वर प्रकल्पाबाबत घेतली भेटगडचिरोली : गोदावरी नदीवर सिरोंचा तालुक्याच्या पोचमपल्ली गावाजवळ मेडिगट्टा-कालेश्वर बॅरेज बांधकामासाठी सर्वेक्षण सुरू आहे. हे बॅरेज बांधकाम कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी गडचिरोली व चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तेलंगणा व महाराष्ट्राच्या आंतरराज्यीय बैठकीत स्थानिक शेतकऱ्यांची भूमिका प्रखरपणे मांडावी, अशी मागणी अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दीपक आत्राम यांनी जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्याकडे केली आहे. शनिवारी आदिवासी विद्यार्थी संघाच्या शिष्टमंडळाने गडचिरोली येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी या प्रश्नावर चर्चा केली. यावेळी माजी आमदार दीपक आत्राम, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, ज्येष्ठ नेते मंदा शंकर, आविसंचे सिरोंचा तालुकाध्यक्ष बानय्या जनगम, सिरोंचाचे माजी उपसरपंच रवी सल्लम, रवी बोगोनी, लक्ष्मण बोल्ले, पेंटीपाकाचे उपसरपंच कुमरी जडवेली आदी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार दीपक आत्राम यांनी या बॅरेजमुळे सिरोंचा तालुक्यातील २१ गावांचे नुकसान होणार असून या भागातील शेतकऱ्यांची सुपीक शेतजमीन नष्ट होऊन त्यांना गाव सोडून स्थानांतरित व्हावे लागणार आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रृजला श्रवंती (प्राणहिता-चव्हेला) लिफ्ट एरिगेशन प्रकल्पाचे बांधकामही थांबविण्यात यावे, अशी मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी प्राणहिता-चव्हेला योजना २०११ मध्ये सुरू झाली. त्यावेळी तत्कालीन सरकारने सदर कामाचा करार केला, असे सांगितले. मात्र आता या धरणाची उंची चार मीटरने कमी करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी दीपक आत्राम यांनी तेलंगणा व महाराष्ट्र या दोन राज्याची आंतरराज्यीय समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही बोलविण्यात आले आहे. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या जनतेचा मुद्दा प्रखरपणे मांडावा, अशी विनंती त्यांच्याकडे केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत याच प्रश्नावर अनेक बाबींवर सविस्तर चर्चा झाली. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांनी तेलंगणा शासनाकडे स्थानिकांची भूमिका मांडावी
By admin | Published: February 07, 2016 2:23 AM