तलावाची पाहणी : नक्षलग्रस्त भागात दौरा लोकमत न्यूज नेटवर्क कमलापूर : अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील तलावातील गाळ उपशाची जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी शुक्रवारी पाहणी केली. त्याचबरोबर अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून या परिसरातील मूलभूत समस्या जाणून घेतल्या. कमलापूर येथे २७ हेक्टर क्षेत्रात जंगल भागात तलाव आहे. मागील अनेक वर्षांपासून या तलावाची दुरूस्ती करण्यात आली नव्हती. त्याचबरोबर दरवर्षी साचणाऱ्या गाळामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. तलावाची दुरूस्ती करून गाळ उपसा करावा, अशी मागणी कमलापूरच्या सरपंच रजनीता मडावी यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे वेळोवेळी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन तलाव खोलीकरणाचे निर्देश दिले होते. तलाव खोलीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. येथून जवळच असलेल्या हत्ती कॅम्पलाही भेट दिली. यावेळी सरपंच रजनीता मडावी यांच्यासह तहसीलदार प्रशांत घोरूडे, राजू आत्राम, बकय्या चौधरी, संतोष ताटीकोंडावार, रवी कोलावार, संदीप रंगुवार, नागेश मडावी, कोरके, गणू वेलादी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी जाणल्या कमलापूर परिसरातील समस्या
By admin | Published: June 24, 2017 1:19 AM