कोरची केंद्राला भेट : मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन गडचिरोली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पहिल्या टप्प्याचे मतदान १६ फेब्रुवारी रोजी होत आहे. ८ तालुक्यात ४ लाख ३६ हजार २२८ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बाजवतील. मतदारांनी अधिक प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी केले आहे. निवडणुकीसाठी प्रशासन आणि पोलीस दल सज्ज आहे. पहिल्या टप्प्यात मतदार गटाची एकूण संख्या ३५ असून ७० गणासाठी गुरूवारी मतदान होईल. यासाठी ७१० मतदान केंद्र कार्यान्वित आहेत. यात २३३ संवेदनशील असून १६० मतदान केंद्र अतिसंवेदनशील आहेत. सकाळी ७.३० वाजतापासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नायक यांनी मंगळवारी कोरची, कुरखेडा, वडसा आणि आरमोरी तालुक्यातील मतदान केंद्रांना भेटी देऊन सुरक्षा व्यवस्था आणि मतदानपूर्व तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समावेत उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम व इतर अधिकारी उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात ४ लाख ३६ हजार २२८ मतदारांमध्ये २ लाख २५ हजार २०३ पुरूष मतदार असून स्त्री मतदारांची संख्या २ लाख ११ हजार २५ इतकी आहे. पहिल्या टप्प्यात ७१० केंद्रांवर ३ हजार ३०२ अधिकारी, कर्मचारी मतदान प्रक्रियेचे काम बघतील. गेल्या काही निवडणुकांपासून मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे. यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे स्थानिक गोंडी, माडिया, बंगाली, उर्दू आणि छत्तीसगडी भाषेचा वापर करून मतदारांना आवाहन करणारे बॅनर्स प्रशासनातर्फे लावण्यात आले आहे. सर्व केंद्रांवर पोलिंग पार्ट्या दाखल झाल्या असून त्याचा आढावाही जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी घेतला व त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांनी दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांना निवडणूक व्यवस्थेची माहिती दिली. (जिल्हा प्रतिनिधी)
मतदानपूर्व तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2017 1:51 AM