इंदिरानगर परिसराला भेट : सोयीसुविधांची जाणली माहितीगडचिरोली : गडचिरोली नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी १८ डिसेंबर रोजी शहरातील एकूण ४३ केंद्रावरून मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन त्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत सहायक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, नगर पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने उपस्थित होते. गडचिरोली नगर पालिका निवडणुकीसाठी शहरात एकूण ४३ मतदान केंद्र राहणार असून या केंद्रांवर एकूण ३७ हजार २६४ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. यामध्ये १८ हजार ८६४ पुरूष व १८ हजार ४०० महिला मतदारांचा समावेश आहे. देसाईगंज येथे निवडणुकीसाठी २६ मतदान केंद्र ठेवण्यात येणार असून या केंद्रांवरून एकूण २३ हजार १०२ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. यामध्ये ११ हजार ५३९ पुरूष व ११ हजार ५६३ महिला मतदारांचा समावेश आहे.जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी गडचिरोली व देसाईगंज नगर पालिकेच्या मतदान प्रक्रियेबाबतच्या सोयीसुविधांवर नजर ठेवून आहेत. गडचिरोली शहरातील मतदान केंद्रांवर पुरेशा प्रमाणात चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे. संबंधित मतदान केंद्राची इमारत कशी आहे, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे काय याची माहिती जिल्हाधिकारी नायक यांनी जाणून घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी गडचिरोली शहरातील सर्वच ४३ मतदान केंद्रांची माहिती जिल्हाधिकारी नायक यांना दिली. याप्रसंगी तहसील व नगर परिषद कार्यालयाच्या निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली शहरातील मतदान केंद्रांची पाहणी
By admin | Published: October 20, 2016 2:26 AM