रवी गावाला भेट : ग्रामस्थांशी संवाद लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : तालुक्यातील रवी येथील वामन दशरथ मराप्पा या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्यांना १३ मे ला ठार केले. या घटनेनंतर १६ मे रोजी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी रवी गावाला भेट देऊन मराप्पा कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच सानुग्रह रक्कम तत्काळ मंजूर करण्याच्या सूचना उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांना दिल्या. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली असता, ग्रामस्थांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे रेटून धरली. जंगलात गस्तीचे प्रमाण वाढवावे, पिंजरे लावावे, तसेच वनकर्मचाऱ्यांनी अधिकाधिक गस्त वाढवावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी वनपरिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर यांना दिल्या. रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडित होणार नाही, अशी सूचनाही तहसीलदार धाईत व वीज वितरण कंपनीचे उपअभियंता तुपकर यांना दिल्या. शेतकऱ्यांनीही समुहाने कामे करावी, असे जिल्हाधिकारी नायक यांनी ग्रामस्थांना सांगितले. यावेळी एसडीओ दामोदर नान्हे व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी केले मराप्पा कुटुंबीयांचे सांत्वन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2017 12:23 AM