५ ला तालुकास्तरावर होणार सोडत : अनेक प्रस्थापित राजकीय नेत्यांना धक्का बसण्याची शक्यतागडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी तालुक्यातील एक जिल्हा परिषद क्षेत्र कमी होऊन मुलचेरा तालुक्यात दोन ऐवजी तीन क्षेत्र नवे क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे मुलचेरा तालुक्यात आता एका अतिरिक्त क्षेत्राची भर पडली आहे. २०१७ च्या जानेवारी महिन्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असून डिसेंबर महिन्यात या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ५ आॅक्टोबर रोजी प्रत्येक तालुक्यात जिल्हा परिषद क्षेत्राचे आरक्षण ठरविण्यासाठी सभांचे आयोजन करण्यात आले आहे. संभाव्य आरक्षणाचा आराखडा गडचिरोली जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. त्याला मान्यता मिळाली असून जिल्ह्यातील ५१ पैकी २२ जिल्हा परिषद गट हे अनुसूचित जमातीसाठी तर पाच अनुसूचित जातीसाठी राखीव राहणार आहे. नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी १४ तर खुल्यासाठी १० मतदार संघ निश्चित करण्यात आले आहेत. विद्यमान परिस्थितीत कुरखेडा तालुक्यात जवळजवळ पाचही मतदार संघ अनुसूचित जमाती व अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने विद्यमान जि.प. उपाध्यक्ष जीवन पाटील नाट यांच्यासाठी आगामी निवडणुकीत मोठी अडचण निर्माण होणार आहे. तसेच विद्यमान पशुसंवर्धन व कृषीसभापती अजय कंकडालवार यांच्या अहेरी तालुक्यातही जिल्हा परिषदेचे जवळजवळ पाच क्षेत्र अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने त्यांनाही आगामी निवडणुकीत अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. धानोरा तालुक्यातही काँग्रेस पक्षाच्या दोन जिल्हा परिषद सदस्यांवर विस्थापित होण्याची पाळी संभाव्य आरक्षणामुळे येणार असल्याचे दिसून येत आहे. आरमोरी तालुक्यात मात्र २०१२ प्रमाणेच आरक्षण मतदार संघाचे राहिल, असा अंदाज आहे. विद्यमान स्थितीत आरमोरी तालुक्यात अनुसूचित जमातीसाठी केवळ एकच मतदार संघ होता. यावेळी दोन मतदार संघ राहण्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी बहूल भाग असलेल्या व पेसा गावांची संख्या अधिक असलेल्या तालुक्यांमध्ये काही जिल्हा परिषद क्षेत्र खुल्या/नामाप्रसाठी राखीव झाल्याने या विषयीही अनेकांना आश्चर्य आहे. त्यामुळे या आरक्षणाला न्यायालयात दाद मागण्याची तयारीही सध्या सुरू आहे. विद्यमान स्थितीत अनेक राजकीय नेत्यांवर विस्थापित होण्याची पाळी आरक्षणामुळे येण्याची शक्यता निर्माण झाली असून काहींनी तालुक्यातील दुसऱ्या मतदार संघातून लढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)चामोर्शी, देसाईगंज, मुलचेरा यांच्यावर अनेकांची नजरचामोर्शी तालुक्यात नऊ जिल्हा परिषद क्षेत्र आहेत. यातील आठ जिल्हा परिषद क्षेत्र खुले/नामाप्रसाठी तर देसाईगंज तालुक्यात तीन पैकी तीन, मुलचेरा तालुक्यात दोन, गडचिरोली तालुक्यात तीन क्षेत्र नामाप्र/खुले प्रवर्गासाठी राखीव राहणार आहे. येथे लढण्यासाठी अनेक दिग्गजांनी आपली तयारी चालविली आहे. ५ तारखेला निघणाऱ्या आरक्षणात पुरूष, महिला यांच्यासाठी कोणते क्षेत्र राखीव होते. याचा फैसला झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग येईल.२००२ नंतर चक्रानुक्रम आरक्षणाला सुरूवात२००२ पूर्वी जिल्हा परिषद क्षेत्राचे आरक्षण हे विधानसभेप्रमाणे निश्चितच राहत होते. अनुसूचित जाती, जमातीचे मतदार संघ राखीव असायचे. मात्र त्यानंतर चक्रानुक्रम आरक्षण सुरू झाले. या आरक्षणात संपूर्ण जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या आधारावर जिल्हा परिषद क्षेत्राचे आरक्षण निश्चित केल्या जाऊ लागले. आगामी निवडणुकीसाठी आलेले आरक्षण २००२ च्या वेळी असलेल्या आरक्षणासारखेच असल्याचे अनेक राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
मुलचेरा तालुक्यात एक जि.प. क्षेत्र वाढले
By admin | Published: October 04, 2016 12:54 AM