अध्यक्षांसह चार पदांवर महिलांना संधी : अहेरी विधानसभा क्षेत्राला मिळाली चार पदे गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला जनाधार मिळाला असला तरी आघाडी करून सत्ता स्थापन करावी लागल्याने पदांच्याबाबत भाजपला दुय्यम स्थानावरच समाधान मानावे लागले आहे. यंदा पहिल्यांदाच मागील दहा वर्षात अहेरी विधानसभा क्षेत्राच्या पदरात उपाध्यक्षांसह चार सभापती पद पडले आहेत. यामागे आदिवासी विद्यार्थी संघाशी झालेली भाजपची युती कारणीभूत आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापती पदाची निवडणूक बुधवारी जिल्हा परिषदेच्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात पार पडली. यात समाजकल्याण सभापतीपदी भाजपच्या माधुरी संतोष उरेते यांची वर्णी लागली आहे. त्या गडचिरोली जिल्हा परिषदेवर मुलचेरा तालुक्याच्या कोठारी-शांतीग्राम मतदार संघातून निवडून आल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार व धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या तनूश्री आत्राम यांचा पराभव केल्याने त्यांचा विजय हेवीवेट ठरला होता. त्यामुळे त्यांना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी सभापतीपदाची भेट दिली, अशी राजकीय गोटात चर्चा आहे. शिवाय उरेते परिवार हा अहेरीच्या आत्राम राजघराण्याशी मागील तीन पिढ्यांपासून जुळलेला असल्याने स्वत: राणी रूक्मीणीदेवी आत्राम या माधुरी उरेतेंच्या प्रचारासाठीही गेल्या होत्या. त्यामुळेच त्यांना सभापतीपद मिळेल, हे विजयानंतर निश्चित झाले होते. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले. महिला बालकल्याण सभापतीपदी आविसंकडून सिरोंचा तालुक्याच्या नारायणपूर-जानमपल्ली मतदार संघातून निवडून आलेल्या जयसुधा बानय्या जनगाम यांची वर्णी लागली आहे. सिरोंचा तालुक्यात आविसंला पाहिल्यांदाच दोन जागांवर विजय मिळाला. त्यामुळे आविसंने सिरोंचाला पद देऊन झुकते माप दिले आहे. जयसुधा जनगाम यांचे पती बानय्या जनगाम हे आदिवासी विद्यार्थी संघाचे सिरोंचा तालुकाध्यक्ष असल्याने त्यांना सभापतीपद दिल्या गेले. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसकडून बांधकाम व नियोजन सभापती पदावर माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम-हलगेकर यांची वर्णी लागली आहे. त्या सिरोंचा तालुक्याच्या जाफ्राबाद-विठ्ठलरावपेठा मतदार संघातून निवडून आल्या आहेत. त्यामुळे यावेळी अहेरी विधानसभा क्षेत्र पदांमध्ये मालामाल झाले आहे. कधी नव्हे ते सिरोंचा तालुक्याला दोन-दोन सभापतीपद मिळाले आहेत. सध्याचा विचार करता अहेरी तालुक्याला जि. प. चे उपाध्यक्षपद, याशिवाय मुलचेरा तालुक्याला एक सभापतीपद तर सिरोंचा तालुक्याला दोन सभापती पद मिळाले आहेत. याशिवाय भाजपचे ज्येष्ठ नेते व देसाईगंज तालुक्यातून जि. प. वर निवडून आलेले कोंदडधारी ऊर्फ नाना नाकाडे यांची भाजपकडून जि. प. च्या कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी वर्णी लावण्यात आली आहे. नाकाडे हे भाजपच्या जनसंघाच्या काळापासूनचे नेते असून त्यांची पहिल्यांदाच निवडून आल्यावर सभापतीपदी वर्णी लागली. आरमोरी विधानसभा क्षेत्राला नाकाडेंच्या रूपाने प्रतिनिधीत्व देण्यात आला आहे. भाजप, आविसं, राकाँला सभापती पदाच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर सर्व नवनिर्वाचित सभापतींचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगीता भांडेकर, खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, आ. क्रिष्णा गजबे, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी आ. दीपक आत्राम, उपाध्यक्ष अजय कंकडालवार, ज्येष्ठ सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार, प्रदेश सदस्य बाबुराव कोहळे, भाजपचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, डॉ. भारत खटी, प्रकाश अर्जुनवार, रामेश्वर सेलुकर, रेखा डोळस आदींनी अभिनंदन केले. यावेळी जि. प. चे सदस्य व भाजप, राकाँ, आविसं कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी) सभापती निवडणुकीत राकाँ व काँग्रेसचे मतदार फुटले भाजप, आविसं व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती पद निवडणुकीत आघाडी झाली होती. त्यानुसार आविसंला उपाध्यक्ष व एक सभापती पद तर राकाँला एक सभापती पद देण्याचे निश्चित झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने सभापतीपदासाठी भाग्यश्री आत्राम-हलगेकर यांचा अर्ज दाखल केला. तर राकाँचेच जगन्नाथ पाटील बोरकुटे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. सभापतीपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. उल्लेखनीय बाब म्हणजे सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्याची शक्यता असल्याचे वृत्त लोकमतने बुधवारी प्रसिद्ध केले होते. त्यावर निकालाने शिक्कामोर्तब झाले. या निवडणुकीत भाग्यश्री आत्राम यांना सर्वाधिक ३५ मते मिळाली. काँगे्रसच्याही तीन सदस्यांनी त्यांना मतदान केले. बोरकुटेंना केवळ १५ मतावरच समाधान मानावे लागले. भाग्यश्री आत्राम यांच्या बाजुने ३५ सदस्यांनी मतदान केले. यात भाजपचे २०, आदिवासी विद्यार्थी संघाचे ७, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ तर काँग्रेसच्या रूपाली संजय पंदीलवार, वैशाली किरण ताटपल्लीवार व कविता प्रमोद भगत यांनीही भाग्यश्री आत्राम यांच्या बाजूने मतदान केले. तर भाजपचे कोंदडधारी ऊर्फ नाना नाकाडे यांना ३३ मते मिळाली. त्यांना काँग्रेसचे कुरखेडा तालुक्यातील सदस्य प्रल्हाद कराडे यांनी मतदान केले. काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभे असलेले ग्रामसभेचे जि. प. सदस्य सैनू मासू गोटा यांना १९ मते मिळाली. त्यांना काँग्रेसच्या १५ सदस्यांसह राकाँचे जगन्नाथ बाजीराव बोरकुटे व अॅड. लालसू नरोटे, अपक्ष अतुल गण्यारपवार व स्वत: गोटा यांनी मतदान केले. तर जगन्नाथ बोरकुटे यांना काँग्रेसचे ११, ग्रामसभेचे २, अपक्ष गण्यारपवार यांचे १ व बोरकुटे यांचे स्वत:चे १ असे १५ मते मिळाले. महिला व बालकल्याण समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भाजप-आविसं-राकाँ आघाडीच्या जयसुधा बानय्या जनगाम यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या वैशाली किरण ताटपल्लीवार यांचा ३३ विरूद्ध १८ मतांनी पराभव केला. तर समाजकल्याण सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या माधुरी संतोष उरेते यांनी काँग्रेसचे गटनेते मनोहर तुळशिराम पोरेटी यांचा ३३ विरूद्ध १८ मतांनी पराभव केला. तर इतर दोन सभापती पदाच्या निवडणुकीत भाग्यश्री आत्राम यांना ३५, सैनू मासू गोटा यांना १९, भाजपचे नाना ऊर्फ कोंदडधारी नाकाडे यांना ३३ तर राष्ट्रवादीचे बंडखोर सदस्य जगन्नाथ बाजीराव बोरकुटे यांना १५ मते मिळाले. काँग्रेसचे मतदान फुटल्याने बोरकुटे यांना केवळ १५ मतांवरच समाधान मानावे लागले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम पाहिले.
जि. प.वर आता महिलाराज
By admin | Published: March 30, 2017 1:42 AM