शंतनू गोयल यांची माहिती : शाळांसह सर्वच विभाग सहभागी होणार गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेअंतर्गत तंबाखूमुक्तीचा कार्यक्रम लवकरच राबविला जाणार आहे. यंत्रणेतील सर्व घटक या कार्यक्रमात सहभागी होतील, अशी माहिती गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी लोकमतशी बोलताना दिली. गडचिरोली जिल्ह्यात व्यसनमुक्ती कार्यक्रमावर भर दिला जात आहे. या कार्यक्रमात शाळकरी विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षक यांनीही सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तंबाखूमुक्त जिल्हा हा संकल्प जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख म्हणून आपण केला आहे. या कार्यक्रमात सर्वांना सहभागी करून घेतले जाणार आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गडचिरोली जिल्ह्यात मलेरियाची साथ मोठ्या प्रमाणावर निर्माण होते. या साथ रोगापांपासून सर्वसामान्य नागरिकांचा बचाव करण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे. या कामी वर्तमानपत्रांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन गोयल यांनी केले. रिक्त पदे असतानाही प्रशासकीय गाडा योग्यरितीने हाकून जनतेला लोकाभिमूख प्रशासन देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य विभागाने सध्या पावसाळ्याच्या दिवसात मुलांची योग्य काळजी घेण्यासाठी अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत प्रत्येक अंगणवाडी महिला व आशा वर्कर गाव, खेड्यापर्यंत जाऊन काम करणार आहेत. नागरिकांनी या आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक ते सहकार्य करून अतिसार नियंत्रण कार्यक्रमाला यशस्वी करावे, असे म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)
जि. प. तंबाखू मुक्तीचा कार्यक्रम राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2016 2:14 AM