- वर्षभरात ७५ कोटी ९४ लाखांची दिली मजुरी
गडचिरोली : गेल्या आर्थिक वर्षात संपूर्ण देशात कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन होते. अशावेळी कित्येक मजुरांच्या हाताला काम नव्हते. मनरेगातून (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दिष्टांपेक्षा जास्त, म्हणजे १४१ टक्के उद्दिष्ट गाठत मजुरांना मोठा दिलासा देण्यात आला. यामुळे गडचिरोली जिल्हा मनरेगातील कार्यात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
मनरेगाचे मूलभूत उद्दिष्ट अकुशल हातांना काम उपलब्ध करून देणे आहे. सन २०२०-२१ या वर्षात जिल्ह्यात प्रत्यक्ष कार्यरत २ लाख ९३ हजार १०१ सक्रिय मजुरांपैकी १ लाख ९२ हजार ३४४ इतक्या मजुरांच्या हातांना काम देण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे अन्य रोजगार बंद असताना मनरेगा मजुरांच्या मदतीला धावून गेली. जिल्हा प्रशासनाने जास्तीत जास्त अकुशल कामांचे नियोजन करून प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून दिला. मनरेगामध्ये ६० : ४० असे अकुशल व कुशल कामांचे प्रमाण असताना ७५ कोटी ९४ लाख रुपये अकुशल स्वरूपाच्या कामांवर खर्च करण्यात आले असून, १५ कोटी २४ लाख रुपये कुशल स्वरूपाच्या कामांवर खर्च करण्यात आले. त्यानुसार हे प्रमाण (८४ : १६) असे येते.
मनरेगामधून घेण्यात आलेल्या कामांमध्ये जलसंधारण, कृषिविषयक कामांचे प्रमाण जास्त आहे. त्याचा परिणाम जलसाठा होण्यास व पर्यायाने कृषिविषयक उत्पन्नवाढीत होणार आहे.
नवीन वर्षात ४५७ ग्रामपंचायतींमध्ये काम
सन २०२१-२२ या वर्षाकरिता मनरेगातून रोजगार निर्मिती करण्यासाठी एकूण ४५७ ग्रामपंचायतींमध्ये ६२ हजार ७०७ कामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्या कामांमधून २९०.४ लक्ष मनुष्यदिन रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया जाधव यांनी दिली. याकरिता जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे मार्गदर्शन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यकार्यकारी अधिकारी माणिक चव्हाण यांनीदेखील योगदान दिले आहे. जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.
पाच वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक काम
- सन २०२०-२०२१करिता गडचिरोली जिल्ह्यात २४.५१ लक्ष मनुष्यदिन निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३१ मार्च २०२१ अखेरीस जिल्ह्याने ३४.५७ लक्ष मनुष्यदिन निर्मिती केली आहे. लक्ष्यांकाच्या तुलनेत १४१ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. मागील पाच वर्षांत उद्दिष्टाच्या तुलनेत प्रत्यक्ष गाठलेले हे सर्वाधिक मोठे यश आहे.
- २०२०-२१ या वर्षात १ लाख ९२ हजार ३४४ मजुरांना रोजगार देण्यात आला. यातून ३४ लाख १९ हजार ३६६ मनुष्यदिवस रोजगार निर्माण झाला. यात गडचिरोली जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या वर्षात अकुशल मजुरांना ७५ कोटी ९४ लाखांची मजुरी देण्यात आली.
नियोजन विभागाच्या २ सप्टेंबर २०२०च्या शासन परिपत्रकानुसार ग्रामसमृद्ध ही नवीन संकल्पना पुढे आणण्यात आली. त्यानुसार मनरेगातून ग्रामविकास साधावा व जॉबकार्डधारक मजूर लखपती व्हावा ही संकल्पना आहे. त्याआनुषंगाने पायलट स्वरूपात १२९ गावांचे नियोजन करण्यात आले आहे. यातून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल.
- दीपक सिंगला, जिल्हाधिकारी