तंबाखू व दारूमुक्तीवर कार्यशाळा : अभय बंग यांचे प्रतिपादनगडचिरोली : व्यसनमुक्तीसाठी शासनस्तरावर कठोर कायदे केलेले आहे. या कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी होण्यासाठी व आपला गडचिरोली जिल्हा संपूर्ण व्यसनमुक्त करण्यासाठी १२ तालुक्यात मुक्तीपथ अभियान सुरू करण्यात येत आहे. लोकशिक्षण, प्रबोधन व समाज जागृतीतूनच याबाबत असलेला निर्बंधात्मक कायदा राबविता येईल. तसेच गडचिरोली जिल्हा व्यसनमुक्त होईल, असे प्रतिपादन सर्चचे संचालक डॉ. अभय बंग यांनी केले. तंबाखू व दारूमुक्त जिल्हा विकास कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांची एक दिवशीय कार्यशाळा पार पडली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, सहायक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, डॉ. कैलाश नगराळे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. बंग म्हणाले की, गडचिरोली जिल्हा दारू व तंबाखुमूक्त व्हावा, या उद्देशाने मुक्तीपथ अभियान जिल्ह्यात सुरू होत आहे. तंबाखू व दारूचा वापर हे भारतात रोग निर्मितीचे प्रमुख कारण झाले आहे. यामुळे कॅन्सर, बीपी, लकवा, हृदयरोग, अपघात व आत्महत्या असे अनेक रोग निर्माण होत आहे. सदर समस्या गंभीर होत असल्याने तंबाखू व दारूचा वापर वेगाने कमी करणे आवश्यक झाले आहे. यापूर्वीचा अनुभव बघता केवळ बंदी अथवा व्यसनमुक्ती असे एकांगी काम करून भागणार नाही. यासाठी अनेकांगी कार्यक्रमाचा वापर करून ही समस्या नियंत्रित करण्यासाठी मुक्तीपथ अभियान सुरू करण्यात येत आहे. यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून राज्यस्तरावर मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगटाची स्थापना करण्यात आली आहे. समाज जागृतीसाठी शासकीय विभाग, मुक्तीपथ, ग्रामसभा व प्रसार माध्यमे यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे, असेही डॉ. बंग यावेळी म्हणाले. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भंडारी यांनी दारू व तंबाखू व्यसनाचे शरीरावरील दुष्पपरिणामाबाबत सादरीकरणातून विस्तृत माहिती सादर केली. यावेळी उपस्थित सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी दारू व तंबाखूयुक्त पदार्थ सेवन करणार नाही, असा संकल्प केला. कार्यशाळेला शासकीय विभागाचे सर्व कार्यालय प्रमुख, कर्मचारी, सर्चचे पदाधिकारी उपस्थित होते. संचालन डॉ. कैलाश नगराळे यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)व्यसनमुक्ती करणाऱ्यांचा होणार गौरवप्रत्येक कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील कर्मचारी व्यसनमुक्त होण्यासाठी प्रयत्न करावे. त्याची माहिती वेळोवेळी अवगत करावी, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी केल्या. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी संपूर्ण व्यसनमुक्त होऊन समाजात आदर्श निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतील. त्यांचा यथोचित सत्कार करून बक्षिस प्रदान करण्यात येईल, असा मनोदय जिल्हाधिकारी नायक यांनी यावेळी व्यक्त केला.शासकीय विभागाचे सर्व कार्यालय व्यसनमुक्त होणे गरजेचे आहे. त्यासाठी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
लोकशिक्षण, प्रबोधन व समाज जागृतीतून जिल्हा व्यसनमुक्ती होईल
By admin | Published: September 10, 2016 1:12 AM