निवेदन सादर : संतप्त महिला कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विरोधात केली घोषणाबाजीगडचिरोली : अनेकदा निवेदन देऊन तसेच पाठपुरावा करूनही शासन व प्रशासनाने अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढल्या नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन जिल्हा गडचिरोलीचे संघटक देवराव चवळे, डॉ. महेश कोपुलवार, अमोल मारकवार यांच्या नेतृत्वात गुरूवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात अनिता अधिकारी, कौशल्या गोंधोडे, बसंती अंबादे, राधा ठाकरे, मिनाक्षी झोडे, शशीकला धात्रक, विनोद झोडगे, जलील पठाण, प्रकाश ठलाल आदीसह आयटकचे पदाधिकारी व अंगणवाडी महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. या धरणे आंदोलनादरम्यान संतप्त अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाविरोधात प्रखर शब्दात नारेबाजी केली. तसेच अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे मानधन देण्यास दिरंगाई करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनावरही ताशेरे ओढले. आयटक संघटनेच्या शिष्टमंडळाने जि.प.चे महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन जाधव यांच्या मार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. (प्रतिनिधी)या आहेत मागण्याअंगणवाडी कर्मचाऱ्यांना पूर्व प्राथमिक शिक्षिकेचा दर्जा देऊन वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ पर्यंतचे एरियस त्वरित देण्यात यावे, दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत मानधन देऊन प्रवासभत्ता व इंधन बिल अदा करण्यात यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वर्षाकाठी २० दिवसांच्या वैद्यकीय रजा व खर्चपूर्ती लागू करण्यात यावी, गणवेश धुलाई भत्ता देण्यात यावा, अंगणवाडीचे विद्युत बिल भरण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
अंगणवाडी महिलांचे जि.प. समोर धरणे
By admin | Published: March 11, 2016 2:03 AM