वैरागड : येथील जुना बाजार चौकातील डांबरी रस्त्याची जड वाहनांच्या वर्दळीमुळे प्रचंड दुरवस्था झाली होती. याची दखल घेत आरमोरी सार्वजनिक बांधकाम विभागाने बाजार चौकात खड्डे पडलेल्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट टाकून पक्का रस्ता बनविला. परंतु दोन महिन्यातच हा रस्ता उखडला.
गोठणगाव फाटा ते वैरागड या मार्गाने होणाऱ्या आंतरराज्य जड वाहतुकीमुळे वैरागड बाजार चौकाची कमालीची दुरवस्था झाली होती. जिल्हा मार्ग असल्याने आरमोरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणची दुरुस्ती करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संपत आडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केल्यानंतर आरमोरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामासाठी निधी उपलब्ध करून सिमेंट काँक्रीटीकरण केले. परंतु सततच्या जड वाहतुकीमुळे दोन महिन्यातच हा रस्ता एका बाजूने उखडला. या रस्त्याचे एका बाजूने बांधकाम झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने बांधकाम करण्यासाठी रस्ता मोकळा करून देण्यात आला हाेता. परंतु रस्ता परिपक्व होण्यापूर्वीच अवजड वाहनांच्या आवागमनामुळे रस्ता तुटून दुरवस्था झाली. अल्पावधीतच तुटलेल्या भागाची दुरूस्ती करण्यात येईल, असे आरमोरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सांगितले होते. परंतु रस्ता पूर्ण होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही बाजार चौकातील उखडलेला सिमेंट रस्ता त्याच अवस्थेत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने बाजार चौकातील उखडलेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बाॅक्स ...
रूंदीकरणाचीही गरज
वैरागड येथील बाजार चाैकातील वळण रस्ता अरूंद आहे. त्यामुळे अवजड वाहने वळविताना अडचणी येतात. अनेकदा येथे विरूद्ध दिशेने एकाचवेळी वाहने आल्यानंतर अपघात हाेण्याचा धाेकाही बळावताे. वळण मार्ग अरूंद असल्याने याेग्य दिशेने वाहने वळविता येत नाहीत. अवजड वाहनांचा ताण वळण रस्त्यावर पडून रस्त्याची दुरवस्था हाेते. त्यामुळे वळण रस्त्याचे रूंदीकरण करणे आवश्यक आहे. परंतु याबाबत कुठल्याही प्रकारच्या हालचाली दिसून येत नाहीत.