विद्यापीठालाही जागा उपलब्ध होणार : खासगी जमीन अधिग्रहणासाठी विधिज्ञांचा सल्ला घेणार गडचिरोली : वडसा-गडचिरोली रेल्वे मार्ग आणि गोंडवाना विद्यापीठासाठीच्या जागेच्या भूसंपादन स्थितीचा विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी मंगळवारी बैठकीत आढावा घेतला. वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्यात आली असून या कामात वडसा आणि आरमोरी तालुक्यातील शासकीय मालकीची जमीन रेल्वेला हस्तांतरीत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. येत आठ दिवसात गडचिरोली तालुक्यातील काम देखील अंतिम टप्प्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी दिली. या रेल्वे मार्गासाठी शासकीय जमीन वगळता जी खासगी जमीन रेल्वेला द्यायची आहे ती वाटाघाटीतून दिली जाणार आहे. या कामी शोध अहवालाचे काम गतिमान पध्दतीने व्हावे, यासाठी नागपूर पध्दतीने विधीज्ञांकडून पूर्ण करून घ्यावे, असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. तसेच गडचिरोली स्थित गोंडवाना विद्यापीठाला स्वतंत्र परिसरासाठी २२१.७ एकर जमीन हवी आहे. ही जमीन शोधून त्या स्वरूपाची माहिती विद्यापीठाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करा सिंचन व्यवस्थेला कृषी उद्योजकतेची जोड दिल्यास एक हंगामी पिकावर समाधानी शेतकऱ्यांना तिन्ही हंगामात भाजीपाला व तेलबियाची शेती शक्य होईल. यातून दरडोई उत्पन्न वाढेल. साधारणत: दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक लागवड क्षेत्र केवळ ३० हजार हेक्टर आहे. ते वाढवून येणाऱ्या काळात ७५ हजार हेक्टरपर्यंत नेण्याचा प्रयत्न कृषी विभागाने करावा, असेही निर्देश आयुक्तांनी दिले. १२ हजार पोलिसांना लागणारा भाजीपाला जिल्ह्याबाहेरून येतो. येथे बाजारपेठ उपलब्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.
रेल्वे मार्ग भूसंपादनाचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा
By admin | Published: April 19, 2017 2:12 AM