विभागीय कृषी संचालक भाेसले यांनी भेटीदरम्यान देऊळगाव येथे विकेल ते पिकेल अभियान, संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभिमान अंतर्गत शेतकरी ते ग्राहक विक्री केंद्राची पाहणी केली. डोंगरसावंगी येथील रामचंद्र दुमाणे यांनी आपल्या एक एकर शेतात कलिंगडाची पेरणी केली. त्यांना २० टन उत्पादन अपेक्षित असून त्यांनी २ क्विंटल कलिंगड थेट विक्री केंद्रावर विक्रीसाठी आणले होते. त्याचीही पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना विभागीय कृषी संचालकांनी मार्गदर्शन करून कलिंगडासोबतच परिसरातील शेतकरी उत्पादित भाजीपाला थेट विक्री केंद्रावर आणतील यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना दिल्या. तसेच किटाळी येथील सतीश लोमेश्वर देशमुख यांच्याकडील दशपर्णी अर्क युनिटची पाहणी केली. सदर शेतकऱ्यांने ४ एकर क्षेत्रात मका पिकाची लागवड करून तीन वेळा दशपर्णी अर्काची फवारणी केल्याने अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला नाही. त्यामुळे खर्चात मोठी बचत झाली, असे सांगितले. कृषी संचालकांनी दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत व त्याची वैशिष्ट्ये जाणून घेतली व दशपर्णी अर्काचा वापर जास्तीत जास्त करावा. शेती क्षेत्रात फळबाग लागवडीवर भर द्यावा, अशा सूचना दिल्या.
याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक व आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. संदीप कऱ्हाळे, उपविभागीय कृषी अधिकारी सचिन कदम, तालुका कृषी अधिकारी टी. डी. ढगे, कृषी पर्यवेक्षक जी. एन. जाधवर, कृषी सहाय्यक वाय. एच. सहारे उपस्थित होते.
बाॅक्स
ज्वारी लागवडीवर भर द्या
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभिमानांतर्गत पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रमांतर्गत चुरमुरा गावाची निवड झाली. त्यामुळे कृषी संचालकांनी चुरमुरा येथे भेट देऊन अतुल भुदेव देशमुख यांच्या शेतातील लागवड केलेल्या ज्वारी पीक प्रात्यक्षिक शेतीची पाहणी केली. ज्वारी पेरणीचे क्षेत्र वाढविण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा, असे आवाहन केले. विशेष म्हणजे, मागील २० वर्षात जिल्ह्यात ज्वारी पिकाचे क्षेत्र झपाट्याने घटले. त्यामुळे पिकाची लागवड जिल्ह्यात कायम राहावी यासाठी शेतकऱ्यांना प्राेत्साहन देणे आवश्यक आहे.