गडचिरोली : माओवाद्यांशी लढताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या जवानांच्या कुटुंबाप्रती सहवेदना जागवत पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी हितगूज साधून मिठाईचे वाटप करत दिवाळी गोड केली. ९ नोव्हेंबरला हा उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे शहीद जवानांच्या कुटुंबीयांना धीर तर मिळालाच; पण विरहातही सणाच्या उत्साहाचे काही क्षण वाट्याला आले.
जिल्हा माओवाद्यांच्या रक्तरंजित थराराने होरपळून निघालेला आहे. आतापर्यंत नक्षल्यांशी दोन हात करताना जिल्हा पोलिस दलातील २१२ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपला देह ठेवला आहे. शौर्य अन् सामर्थ्य दाखवत नक्षलवाद्यांचा मुकाबला करताना शहीद झालेल्या २१२ जवानांपैकी १६९ जवान हे गडचिरोलीचे भूमिपुत्र असून ४३ जवान हे राज्य राखीव पोलिस दल, केंद्रीय राखीव पोलिस दल, भारतीय राखीव दल, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस दल व राज्य गुप्तवार्ता विभाग या सुरक्षा दलातील आहेत.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पोलिस दलाच्या वतीने शहीद जवानांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना मिठाईचे वाटप केले. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक अनुज तारे, कुमार चिंता, यतीश देशमुख उपस्थित होते. प्रभारी जनसंपर्क अधिकारी उपनिरीक्षक शिवराज लोखंडे व सहकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
शहीद जवानांच्या कुुटुंबीयांच्या सदैव पाठीशी
गडचिरोली पोलिस दलात कार्यरत असताना जवान नेहमी आपल्या कुटुंबीयांपासूून दूर राहून कर्तव्य बजावत असतात. जेव्हा एखादा जवान शहीद होतो, त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. जिल्हा पोलिस दल अशा कुटुंबीयांच्या सदैव पाठीशी आहे. त्यांच्या कुटुंबीयांचीही दिवाळी गोड व्हावी, यासाठी हा उपक्रम राबविल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.