गडचिरोली : उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना डी.लिट पदवी देऊन सन्मानित केले जाणार आहे. येथील गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेच्या विशेष सभेत १४ फेब्रुवारी रोजी हा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम १२९(१) (२) मधील तरतुदीच्या अनुषंगाने कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी विद्यापीठाची सन्मान्य पदवी प्रदान करण्याकरीता दोन नावे राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे प्रस्तावित केली होती. त्यानुसार राज्यपालांनी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री मुनगंटीवार या दोन नावास मान्यता दिली. यानंतर ४ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या सभेत सदर दोन नावांची शिफारस अधिसभेला करण्यात आली . करीता व्यवस्थापन परिषदेच्या शिफारशीनुसार दोन व्यक्तीस विद्यापीठाची सन्मान्य पदवी (D.Lit.) बहाल करण्यास्तव संमती मिळण्याकरीता १४ फेब्रुवारी रोजी कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली झानलेल्या अधिसभेच्या बैठकीत ठेवण्यात आली. त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. विद्यापीठाच्या ११ व्या दीक्षांत समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना डी. लीट पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे.