घनश्याम मशाखेत्री
गडचिरोलीः तुम्ही एखाद्या सर्कशीतल्या हत्तीला खोटीखोटी दारू पिऊन धुमाकूळ घातलेला पाहिला असेल. त्याला दादही दिली असेल.. पण खरंच हत्ती जर दारू प्यायले तर काय करतील असा जर प्रश्न पडला तर त्याचे उत्तर गडचिरोलीतील नागरिकांना विचारावे लागेल. कारण, अलीकडे तेथे धुमाकूळ घालत असलेले जंगली हत्ती रात्रीच्या वेळी मोहाच्या दारूचे अड्डे शोधत असतात, असे या नागरिकांच्या लक्षात आले आहे.
गेल्या महिनाभरापासून छत्तीसगडच्या जंगलातून आलेला २२ जंगली हत्तीचा एक कळप गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात भ्रमंती करत आहे. कोवळ्या बांबूचा मुबलक चारा आणि वनतलावातील पाणी यामुळे हे हत्ती परत जाण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. दिवसभर जंगलात भ्रमंती केल्यानंतर हे हत्ती रात्रीच्या वेळी पाण्यात थोडीफार मस्ती करून आराम करतात.
हत्तींच्या या दिनक्रमात कोणालाच काही समस्या नाही, पण रात्रीच्या सुमारास हत्ती वेगवेगळ्या गावात धडक देऊन काही घरांचे नुकसान करत आहेत. त्यामागील कारणाचा शोध वनविभागाने घेतला असता ज्या घरात मोहाफूल, मोहाफुलाची दारू किंवा दारू गाळण्यासाठी सडवा ठेवलेला आहे तिथेच हे हत्ती त्याच्या वासाने येत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे हत्तींचे वास्तव्य असणाऱ्या परिसरातील गावकऱ्यांसाठी ही नवीनच समस्या निर्माण झाली आहे. माणसांसोबत आता हत्तींनाही मोहाच्या दारूचे आकर्षण निर्माण झाले की काय, असा प्रश्न लोक विचारू लागले आहेत.
-