लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : ओबीसी समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेत या समाजाला अर्धेच आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे मराठा समाजासह इतर कोणत्याही जातीला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करू नये, अशी मागणी राष्ट्रपती, राज्यपाल यांना पाठविलेल्या निवेदनातून ओबीसी महासंघ तालुका देसाईगंजने केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, मंडल आयोग, केंद्रीय आयोग, खत्री आयोग, बापट आयोग आदी आयोगाने मराठा समाजाला आरक्षण नाकारले आहे. राणे समितीने दिलेले आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसले नाही. परंतु आता राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात जनसुनवाई ठेवली आहे. मराठा समाज हा प्रगत आहे. आतापर्यंत मराठावाड्यातील जनसुनावणीत अनेक मराठा संघटनाने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशाप्रकारची निवेदने दिली आहेत. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठा समाजाकडे राजकारणातील अनेक पदे आहेत. शिक्षण संस्था, बँका, सहकार क्षेत्र, कारखाने, व्यवसाय, उद्योगधंदे, शेती इत्यादी क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे. तरीही या समाजाला आरक्षण द्यावे, असे वाटत असेल तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्रपणे आरक्षण द्यावे.राज्य मागासवर्ग आयोगाकडूनच मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा भारतीय संविधानाच्या सामाजिक न्यायाच्या उद्देशालाच हडताळ फासण्यासारखे आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केल्यास राज्यात व देशात अराजकता निर्माण होईल. यासाठी राज्य मागासवर्ग आयोगच जबाबदार राहील. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मराठा व इतर कोणत्याही प्रगत जातीचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये, अशी मागणी निवेदनातून केली आहे.सदर निवेदन उपविभागीय अधिकारी देसाईगंज यांच्यामार्फत पाठविण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी मुरलीधर सुंदरकर, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ठेंगरी, धनपाल मिसार, लोकमान्य बर्डे, सरपंच राजेंद्र बुल्ले, योगेश नाकतोडे, नरेश चौधरी, रामजी धोटे, दामोधर शिंगाडे, एकनाथ पिल्लारे, अविनाश ठाकरे, दिलीप नाकाडे, दिनकर राऊत, किशोर पिल्लारे आदी उपस्थित होते.
पुढारलेल्या जातींचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:22 PM
ओबीसी समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेत या समाजाला अर्धेच आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे मराठा समाजासह इतर कोणत्याही जातीला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करू नये, अशी मागणी राष्ट्रपती, राज्यपाल यांना पाठविलेल्या निवेदनातून ओबीसी महासंघ तालुका देसाईगंजने केली आहे.
ठळक मुद्देराष्ट्रपतींना निवेदन : ओबीसी महासंघ देसाईगंजची मागणी