आष्टी : आंध्रप्रदेश शासनाद्वारा वैनगंगा नदीवर चपराळानजीक होऊ घातलेल्या चव्हेला धरणास आष्टी नजीकच्या कुनघाडा माल येथील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला असून महाराष्ट्र शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय माती परीक्षण करू नये, अशी मागणी कुनघाडा मालवासीयांनी २७ मे रोजी आष्टी येथे आयोजित सभेत केली. सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार सिद्धार्थ खंडारे होते. यावेळी नायब तहसीलदार देवेंद्र दहिकर, चंद्रपूर येथील पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बारापात्रे, आंध्रप्रदेशचे उपकार्यकारी अभियंता o्रीनिवास रेड्डी उपस्थित होते. तेलंगणा क्षेत्रातील सिंचन व पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी आंध्रप्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील वर्धा-वैनगंगा नदीवर चपराळा गावाच्या विरूद्ध बाजूला तुमडी या गावात आंध्रप्रदेश शासनाकडून ३८ हजार ५00 कोटी रूपये खर्च करून प्राणहिता नदीवर प्राणहिता चव्हेला धरण उभारण्यात येत आहे. या धरणाच्या भिंतीचे दरवाजे १५२ मीटर ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ४ गावांना व त्याच परिसरातील ५ हजार २५0 एकर शेतीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे चपराळा अभयारण्य, चपराळा तीर्थक्षेत्र, ईल्लुर, ठाकरी, कुनघाडा यासोबतच काही गावांना फटका बसणार आहे. या बंधार्यामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढून आष्टीचा काही भाग देखील प्रभावीत होणार आहे. त्याहूनही धरणाची उंची खूप असल्याने पावसाळ्यातील पाणी येथे साठविल्या जाणार आहे. धरणाच्या ठिकाणी ७0 फुट खोल व १00 फुट रूंद कालवा तयार करून पावसाळ्यानंतर तिथे साचविलेले पूर्ण पाणी हैद्राबादपर्यंत नेण्यात येणार आहे. यामुळे पावसाळ्यानंतर प्राणहिता नदी कोरडी होईल. चपराळापासून तर आवलमरी, व्यंकटापूरपर्यंत पाणीटंचाई निर्माण होणार आहे. यामुळे मासेमारी, सिंचनावर प्रतिकुल परिणाम होईल. पाण्याचे भिषण संकट उभे राहणार असल्याने नागरिक व जनावरांनादेखील पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. चव्हेला प्रकल्पामुळे गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना कोणताच फायदा होणार नाही. मात्र नुकसान होणार आहे. अनेक गावे चव्हेला प्रकल्पाच्या पाण्याखाली येण्याची शक्यता आहे. आंध्रप्रदेश शासनाने कुनघाडा माल येथे पूर्वपरवानगीशिवाय माती परीक्षणासाठी बोअर मारण्यास सुरूवात केली आहे. यामुळे गावकर्यांनी त्याला विरोध केला आहे. अधिकार्यांनी महाराष्ट्र शासनाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय माती परीक्षण करू नये, अशी मागणी गावकर्यांनी केली आहे. या धरणाच्या कामाला दोनही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी यापूर्वीच विरोध केला असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या संदर्भात निवेदनही दिले होते. परंतु त्याचा काहीही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. (वार्ताहर)
चव्हेला धरण भागात माती परीक्षण करू नका
By admin | Published: May 29, 2014 2:21 AM