आढावा बैठक : विभागीय आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आवाहनगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगिण विकास व्हावा ही शासनाची प्राथमिकता आहे. या जिल्ह्यातील सर्वच अधिकाऱ्यांनी कामात पुढाकार घेतला पाहिजे. अधिकारी व कर्मचाऱ्यांची कर्तव्यातील कसूर शासन खपवून घेणार नाही. याची जाणीव ठेवून गतीने काम करावे, असे आवाहन नागपूर विभागाचे आयुक्त अनुपकुमार यांनी केले. दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर आलेले विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी बैठकीला जिल्हाधिकारी रणजितकुमार, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, गडचिरोलीच्या उपवनसंरक्षक लक्ष्मी अनबत्तुला, अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, निवासी उपजिल्हाधिकारी टोनगावकर, जिल्हा नियोजन अधिकारी धनंजय सुटे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी ३७६ गावातील टंचाई स्थितीबाबत माहिती दिली. प्रत्यक्ष पीक कापणीच्या आधारे पुन्हा एकदा अंतिम पैसेवारी निश्चित करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची संधी आपणास आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना मदत करण्याची सकारात्मक भूमिका सर्वांनी ठेवावी, असे ते म्हणाले. टंचाई आराखडा तयार करताना नळ दुरूस्ती, हातपंप व पाणी पुरवठा योजनेच्या दुरूस्तीचे काम प्राधान्याने घ्यावी. टंचाई स्थितीत लोकवर्गणीची अट नसल्याने गतीमान पध्दतीने ही कामे करणे यंत्रणांना शक्य होणार आहे. त्यामुळे अशा पध्दतीच्या नियोजनावर भर द्यावा, असे आयुक्त अनुपकुमार यावेळी म्हणाले.वनहक्क पट्टे, आरोग्य आदीसह विविध विभागाच्या कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. संचालन व आभार प्रदर्शन जिल्हा नियोजन अधिकारी सुटे यांनी केले. (प्रतिनिधी)
कर्तव्यात कसूर करू नका
By admin | Published: October 29, 2015 1:57 AM