लोकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : आदिवासी विकास महामंडळ आणि मार्केटींग फेडरेशनच्या आधारभूत धान खरेदी केंद्रांवर अनेकवेळा बारदान्याचा तुटवडा निर्माण होतो. अनेक शेतकरी स्वत:कडील बारदाना केंद्राला देतात; परंतु शेतकऱ्यांना ना बारदाना परत मिळतो ना त्याचे पैसे मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी नवीन बारदाना विकत घ्यावा लागत आहे.खरीप हंगाम असो किंवा रब्बी हंगाम असो शेतातून हाती पडलेले पीक पोत्यांमध्ये टाकून शेतकरी आधारभूत हमीभाव केंद्रांवर नेतात. आविका संस्थेसह मार्केटींग फेडरेशन अंतर्गत केंद्रांवर बऱ्याचदा बारदान्याचा तुटवडा दिसून येतो. अशावेळी प्रतीक्षा करत बसण्याऐवजी अनेक शेतकरी स्वत:कडील बारदाना वापरतात.
८७ आधारभूत धान खरेदी केंद्रआदिवासी विकास महामंडळ व मार्केटींग फेडरेशनचे मिळून गडचिराेली जिल्ह्यात मागील खरीप हंगामात जवळपास ८७ केंद्रे सुरू करण्यात आली होती. यामध्ये महामंडळाचे केंद्रे अधिक हाेते.
मागील वर्षीचे बारदान्याचे पैसे कधी मिळणार?- अनेक शेतकऱ्यांचा बारदाना आधारभूत धान खरेदी केंद्रांकडे राहतो. केंद्र चालकांकडून अनेकांना पैसे किंवा बारदाना परत देण्याची हमी देतात; परंतु ती केवळ हमीच राहते. अनेकवेळा नवीन बारदाना घ्यावा लागताे. काही शेतकऱ्यांना मागील वर्षीचे बारदान्याचे पैसे अजुनही मिळाले नसल्याची माहिती आहे.
शेतकरी म्हणतात....
मी गेल्या अनेक वर्षांपासून आधारभूत धान खरेदी केंद्रांवर धान विक्रीसाठी नेतो. अनेकवेळा बारदाना नसल्याने धान विक्री प्रभावित हाेते. अशावेळी बारदाना केंद्रांना दिला जातो; परंतु तो परत मिळत नाही. - परशुराम काटेंगे, शेतकरी.
महामंडळाच्या केंद्रावर हमी भाव मिळताे. त्यामुळे आम्ही दरवर्षी महामंळाच्याच केंद्रांवर विकीसाठी धानाची पाेती नेताे. मात्र काहीवेळा तिथे बारदाना उपलब्ध हाेत नसल्याने आम्हाला आमच्याकडील बारदना वापरावा लागताे. - विनायक चुधरी, शेतकरी.
तीन वर्षापुर्वी तुटवडा
महामंडळ आणि मार्केटींग फेडरेशनच्या आधारभूत धान खरेदी केंद्रांवर धानाची माेठया प्रमाणात धानाची खरेदी करण्यात येते. तीन वर्षापुर्वी बारदान्याचा तुटवडा दाेनदा निर्माण झाला हाेता. गतवर्षी बारदाना पुरेशा प्रमाणात उपलब्ध हाेता, अशी माहीती मिळाली.