दिलीप दहेलकरलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पंतप्रधान पीक विमा याेजनेंतर्गत गडचिराेली जिल्ह्यातील आतापर्यंत जवळपास ३७ हजार ५७० शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा विमा काढला आहे. विमा काढूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अपेक्षित विम्याची रक्कम मिळत नसल्याने प्रतिसाद कमी मिळत असल्याचे दिसून येते. दरम्यान प्रिमियमच्या माध्यमातून विमा कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीक विमा काढायचा का? असा प्रश्न जिल्ह्यातील अनेक शेतकरी करताना दिसून येत आहेत.खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना २३ जुलै २०२१ पर्यंत मुदत दिली हाेती. यापुढे सरकारच्या वतीने मुदत वाढल्यास पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू शकते. त्या अनुषंगाने कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांमध्ये प्रभावी जनजागृती हाेणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.
३०% शेतकऱ्यांची पाठ
गतवर्षी जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांचा विमा काढला. नुकसान हाेऊनही विमा कंपन्यांकडून पुरेशी भरपाई मिळाली नाही. यंदा ७०% शेतकऱ्यांनी विमा काढला. ३० टक्क्यांनी पाठ फिरवली
यावर्षी आतापर्यंत केवळ सिराेंचा तालुक्यात १०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.- भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
माझ्याकडे साडेतीन एकर धानाची शेती आहे. गतवर्षी आपण धान पिकाची लागवड करून खरीप पिकांचा विमा काढला. शेवटच्या टप्प्यात पाऊस आल्याने धान पिकाचे नुकसान झाले. कापणी केलेल्या धानाच्या सरड्या ओल्या झाल्या. नुकसानीच्या तुलनेत विम्याची भरपाई मिळाली नाही. शासनाने कंपनीला उचीत निर्देश देऊन बदल करणे आवश्यक आहे.- पंढरी किरंगे, शेतकरी
पंतप्रधान पीक विमा याेजनेंतर्गत खरीप पिकाला विमा देण्याची तरतूद आहे. मात्र कंपन्यांच्या जाचक अटीमुळे भरपाईची रक्कम फार कमी आहे. धान पीक लागवडीचा खर्च गेल्या दाेन वर्षात प्रचंड वाढला आहे. त्यातल्या त्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे धान व इतर पिकांची नुकसान हाेत असते. नुकसानीच्या प्रमाणात विम्याचा लाभ मिळावा.- वासुदेव मडावी, शेतकरी