लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनावर परिणामकारक ठरणाऱ्या काेविशिल्ड आणि काेव्हॅक्सिन या दाेन लसींना औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिली असली तरी ही लस खरंच सुरक्षित आहे ना, लसीचे साईड इफेक्ट तर होणार नाही ना, अशी शंकाही काही नागरिकांच्या मनात आहे. मात्र ज्यांना सर्वप्रथम ही लस दिली जाणार आहे त्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये मात्र लसीबद्दल कोणतीही शंका नाही. जिल्ह्यातील शासकीय, खासगी डाॅक्टर तसेच कर्मचारी मिळून एकूण ९ हजार ९४६ जणांनी लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणीही केली आहे.
गडचिराेली जिल्ह्यात शासकीय व खासगी मिळून जवळपास ५०० डाॅक्टर आहेत. ३५० डाॅक्टर ग्रामीण भागात कार्यरत आहेत, शिवाय १० हजाराच्या आसपास आराेग्य कर्मचारी आहेत. काेराेनावरील व्हॅक्सिन फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात लसीची पुरेशी साठवणूक क्षमता आहे. जिल्ह्यात ७७ ठिकाणी आयएलआर (रेफ्रीजरेटर) उपलब्ध आहेत. याशिवाय केंद्र सरकारकडून जिल्ह्यासाठी ३६ आयएलआर येणार आहेत. साठवणुकीची परिपूर्ण व्यवस्था असल्याची माहिती मिळाली आहे.
काेविड लसीकरणासाठी शासनाच्या वतीने काेविड नावाचे सॉफ्टवेअर विकसित केलाे असून, या साॅफ्टवेअरवर जिल्ह्यातील डाॅक्टर, आराेग्य कर्मचारी व काेराेनाविरुद्धच्या लढाईत याेगदान देणाऱ्या इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांची नाेंदणी केली जात आहे. आतापर्यंत ९ हजार ९४६ जणांची लस घेण्यासाठी ऑनलाईन स्वरूपात नाेंदणी झाली आहे. यामध्ये जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
बाॅक्स
आराेग्य विभागाच्या पुढाकाराने गैरसमज दूर हाेणार
काेराेनावरील लस घेतल्याने काही दुष्परिणाम हाेतील, असे ऐकण्यात आले हाेते. मात्र ते गैरसमज आहे, असे येथील डाॅक्टरांनी सांगितले. डाॅक्टर व आराेग्य कर्मचाऱ्यांवरच पहिल्यांदा लसीचा प्रयाेग हाेणार आहे. त्यानंतर सर्वसामान्य लाेकांमध्ये विश्वास निर्माण हाेऊन गैरसमज दूर हाेतील, असे मत काही डॉक्टरांनी व्यक्त केले.
काेट
काेराेनावर परिणामकारक ठरणारी लस घेण्याकरिता जिल्ह्यात आतापर्यंत ९ हजार ९४६ जणांनी नाेंदणी केली आहे. पहिला टप्प्यात तालुकास्स्तरावर सर्व डाॅक्टर, आराेग्य कर्मचारी, अंगणवाडी महिला, आशावर्कर, मदतनीस आदींना ही लस देण्यात येणार आहे. याबाबतचे नियाेजन युद्धपातळीवर सुरू आहे.
- डाॅ. विनाेद म्हशाखेत्री, एडीएचओ
भारतात निर्माण झालेल्या दाेन्ही लस सक्षम आहेत, असा अंदाज व विश्वास आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत लसीकरणाच्या नियाेजनाबाबत चर्चा झाली. काेणत्याही लसीचा तीन प्रकारची रिॲक्शन हाेण्याची शक्यता असते. यामध्ये तात्काळ, मध्यम व उशिराने हाेणारी रिॲक्शन आदींचा समावेश आहे. स्माॅलपाॅक्स, चिकनपाॅक्सवर लसीकरणाने मात करता आली. काेराेनावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. लसीच्या प्रतिकूल परिणामाबाबत आताच सांगता येणार नाही.
- डाॅ. एस.बी. कुंभारे, जिल्हाध्यक्ष, इंडियन मेडिकल असाेसिएशन