गडचिरोली: जिल्ह्याच्या राजकारणात डाॅक्टरांचा ओढा वाढत आहे. काही डॉक्टरांनी थेट विधानसभा लढवून आमदारकीपर्यंत मजल मारली. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी आरोग्यसेवाच द्यावी, दुसरीकडे लुडबूड करु नये, असा टोला नूतन खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी लगावला. गांधी विचारावर पीएच.डी. मिळवलेले डॉ. किरसान यांनी ६ जून रोजी माध्यमांशी संवाद साधताना यावर सविस्तर भाष्य केले.
जिल्ह्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सुटले पाहिजेत, हे सांगतानाच डॉ. किरसान यांनी या जिल्ह्यातील अनेक डॉक्टर आपला मूळ व्यवसाय सोडून राजकारणात प्रवेश करत असल्याबद्दल काळजी व्यक्त केली. एक डॉक्टर बनविण्यासाठी शासनाचे मोठे संसाधन कामाला लागलेले असते. त्यांना अद्ययावत प्रशिक्षण देऊन तयार केले जाते.
मात्र, वैद्यकीय पदवी संपादन केलेले लोक सेवा देण्याऐवजी राजकारणात लुडगूड करत असतील तर लोकांचे आरोग्य कोण दुरुस्त करणार, असा सवाल डॉ. किरसान यांनी केला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. चंदा व डॉ. नितीन कोडवते या दाम्पत्याने काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. डॉ. किरसान यांचा हा टोला या तिघांना होता की भाजपचे विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांना , अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
अद्याप कोणी संपर्कात नाहीगडचिरोली- चिमूर लोकसभा निवडणुकीत भाजपला दारुण पराभव पत्कारावा लागला. निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे प्रमुख नेते गळाला लावून भाजपने धक्का दिला होता, पण भाजपलाच पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यामुळे काँग्रेसमधून गेलेले पुन्हा घरवापसी करतील का तसेच भाजपमधील कोणी संपर्कात आहेत का, या प्रश्नावर डॉ. किरसान यांनी अद्याप कोणी संपर्कात नाही, असे स्पष्टीकरण देत या चर्चेला पूर्णविराम दिला.