निवेदनात म्हटले आहे की, नगरपंचायत प्रशासनामार्फत ८१.९० लाख रुपये खर्च करून, तत्कालीन ग्रामपंचायतीच्या काळातील जुन्या ११ हातपंपांवर दुहेरी पंप लघुनळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे, परंतु ज्या पंपावर नळयोजना बसविण्यात येणार, त्यामधील बहुधा हातपंपाचे केसिंग लोखंडी पाईपद्वारे करण्यात आले आहे. जुने लोखंडी पाइप दबले आहेत, तसेच गंजले आहेत. परिणामी, पाणी बाहेर फेकण्याची क्षमता कमी झाली आहे. चंद्रपूर येथील मे.अनुपम भगत या बाह्य मनुष्यबळाने संपूर्ण बनावट चाचणी करून, नगरपंचायत प्रशासनतर्फे शासकीय यंत्रणेची दिशाभूल केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून वॉटर यिल्ड टेस्ट ही प्रत्यक्ष पाहणी न करता कागदोपत्री केल्याने, १ एचपीच्या पाणबुडी पम्पिगद्वारे नागरिकांना दीर्घकाळासाठी पाणीपुरवठा करणे अशक्य आहे. त्यामुळे ही योजना कुचकामी ठरू शकते. शासकीय निधीचा अपव्यय होऊ नये, याकरिता पुन्हा प्रत्यक्षरीत्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग चंद्रपूर यांच्यातर्फे वॉटर यिल्ड टेस्ट करूनच किंवा नगरपंचायत प्रशासनाने लिखित हमी दिल्यानंतरच योजना कार्यान्वित करावी, अशी मागणी उमेश पेळूकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
बाॅक्स
नगरपंचायतीमार्फत कामे करावी
मुलचेरा येथी नवीन ९ विंधन विहिरींची म्हणजेच हातपंपांची कामे नगरपंचायत प्रशासनामार्फत हाती घेण्यात यावी. मुलचेरा येथे पाण्याची कायमस्वरूपी सोय नसल्याने नागरिकांना दीर्घकाळ पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने दर्जेदार व प्रत्यक्षरीत्या कामे होणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर कामांना स्थगिती देऊन संपूर्ण चौकशीनंतरच कामे करावी, अशी मागणीही पेळूकर यांनी केली आहे.