गडचिराेली : बर्ड फ्लू आजार पक्ष्यांपासून थेट माणसाला हाेण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे या आजाराबाबत अनावश्यक भीती बाळगू नये. मात्र आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी केली आहे.
कुक्कुटपालन व्यावसायिकांनी आपल्या पाेल्ट्रीमधील पक्ष्यांचा स्थलांतरित पक्ष्यांशी संपर्क टाळावा. पक्ष्यांच्या पाण्याची व खाद्याची भांडी दरराेज स्वच्छ धुवावी. पाेल्ट्रीमध्ये स्वच्छता ठेवावी. काेंबड्यांना नियमित लसीकरण करावे. पक्षी आजारी पडल्यास किंवा मृत पावल्यास याची माहिती तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यास द्यावी. पक्ष्यांची विष्ठा व नाकातील स्राव यांच्यासाेबत संपर्क येऊ देऊ नका. पक्ष्यांना शक्यताे हाताळू नका. हाताळल्यास साबणाने हात स्वच्छ धुवावे. पक्ष्यांचे पाणी व खाद्य घराबाहेर उघड्यावर ठेवू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.
चिकन विक्रेत्यांनी हॅण्ड ग्लाेव्हज व सॅनिटायझरचा नियमित वापर करावा. खुराड्याची जागा नियमित स्वच्छ ठेवावी. दुकानाचा परिसर सॅनिटायझरने फवारणी करून निर्जंतुक करावा. पक्ष्यांचे पंख जाळून घ्यावे. फार्मवरून आजारी पक्षी आणू नये. वेस्ट मटेरियल प्लास्टिक बॅगमध्ये बांधून जमिनीत पुरावे. सर्व उपकरणे स्वच्छ ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बाॅक्स
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
किमान ३० मिनिटे शिजवलेली अंडी किंवा चिकन खाणे पूर्णत: सुरक्षित आहे. कच्चे मांस किंवा अंडी खाऊ नये. काेंबडी संथ, आजारी नसल्याची खात्री करून खरेदी करावी. कावळा, बगळा, कबुतर इत्यादी पक्षी परिसरात मृतावस्थेत आढळल्यास त्यांना हात लावू नये. ग्रामपंचायत किंवा नगर परिषदेला याची माहिती द्यावी.