लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आकांक्षित, मागास गडचिरोली जिल्ह्यात विकासकामे करताना अनेक अडचणी आहेत. त्यामुळे प्रत्येक कामात नियमांवर बोट ठेवून त्या अडचणीत भर घालण्याऐवजी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे मार्गी लावा, अशी सूचना जिल्हा विकास, समन्वय व सनियंत्रण समितीचे (दिशा) अध्यक्ष तथा खासदार अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांना केली. बुधवारी नियोजन भवनात ही बैठक झाली.
या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, प्रभारी जिल्हाधिकारी सोनप्पा यमगर, उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, दिशा समितीचे सदस्य बाबुराव कोहळे, सदस्य तथा गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे, सदस्य प्रकाश गेडाम, लता पुंगाटे, डी. के. मेश्राम, उपवनसंरक्षक कुमारस्वामी व सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. या कामातील अडचणी अधिकाऱ्यांनी मांडल्यानंतर खासदार नेते यांनी केवळ अडचणीच सांगत राहिल्यास विकासकामांची अंमलबजावणी होणार नाही. त्यासाठी नियमाने मात्र आदिवासी दुर्गम भागातील लोकांचा विचार करून सकारात्मक दृष्टिकोनातून कामे मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी दिशा समितीच्या सदस्यांनी मांडलेल्या विषयांवर अनुपालन सादर करण्यात आले. यामध्ये केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा अध्यक्ष तथा खासदार नेते यांनी घेतला. आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे शिल्लक आहेत, यातील अडचणी सोडविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. आवास योजना, शौचालय बांधकाम यासाठी लाभार्थ्यांना मोफत रेती मिळावी. नियमानुसार त्यांना या कामांसाठी मोफत रेती नेण्यासाठीची प्रक्रिया सर्व तहसील कार्यालयात दर्शनी भागात लावावी, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. कोरचीसह धानोरा भागातील शेतीच्या वीजपुरवठ्याची समस्या सोडवणे तसेच घरगुती वीजबिलातील समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश अध्यक्षांनी यावेळी दिले. प्रस्तावित रेल्वे मार्गातील अडचणी सोडविण्यासाठीही रेल्वे विभागाला सूचना करण्यात आल्या.
अनेकदा निधी अखर्चित राहिल्याने तो परत जाण्याची शक्यता असते. यासाठी हा निधी वेळेत खर्च करावा, असे अध्यक्ष म्हणाले. बँकांमार्फत राबविण्यात येत असलेल्या जनधन योजना, बीमा योजना, जीवन ज्योती व मुद्रा योजनांबाबतचा आढावा घेण्यात आला. बँकांनी लाभार्थ्यांना खरी माहिती देऊन योजनांची प्रसिद्धी करावी तसेच कोणत्याही केंद्रीय योजना बंद झाल्या नसल्याचे खासदार नेते यांनी सांगितले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुरेशकुमार कुमरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.