घरात फूट पाडू नका, मी चूक मान्य केली, तुम्ही ती करु नका
By संजय तिपाले | Published: September 6, 2024 02:41 PM2024-09-06T14:41:26+5:302024-09-06T14:44:24+5:30
भाग्यश्री आत्राम यांच्या संभाव्य बंडावर अजित पवार यांचे भाष्य : मंत्री धर्मरावबाबांची भरसभेत आगपाखड
गडचिरोली: घर फोडण्याचे काम काही जण करत आहेत, घरात फूड पडणे समाजाला आवडत नाही, मी चूक मान्य केली, तुम्ही ती करु नका, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या व माजी जि.प. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांच्या कथित संभाव्य बंडावर भाष्य केले. ज्या बापाने जन्म दिला, त्याच्याच विरोधात लढणार का, असं कसं चालेलं, असा सवालही त्यांनी केला.
अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे क्रीडा संकुल प्रांगणात ६ सप्टेंबरला दुपारी साडेबारा वाजता अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेनिमित्त लाडक्या बहिणींसह शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, रायुकॉ जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, सिनेट सदस्या तनुश्री आत्राम आदी उपस्थित होते.
भाग्यश्री आत्राम या शरद पवार यांना भेटल्याच्या चर्चा होत्या. त्या अहेरीतून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचा कयास आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री धर्मरावबाबा यांनी भरसभेत पहिल्यांदाच जाहीररीत्या भाष्य केले. हा धागा पकडून अजित पवार यांनी स्वत:चे उदाहरण दिले. मात्र, मी चूक मान्य केली, तुम्ही ती करु नका असा सल्लाही त्यांनी भाग्यश्री आत्राम यांना दिला. पुढे ते म्हणाले, लग्नानंतर मुलगी सासरी जाते, पण धर्मरावबाबांनी तुम्हाला बेळगावला न पाठवता येथेच राजकारणात संधी दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष केले. वस्ताद कुस्तीचे सगळे डाव शिकवतो व एक राखून ठेवतो, असा इशारा त्यांनी दिला. अजूनही वेळ गेलेली नाही, प्रत्येकाची ठराविक वेळ असते, धर्मरावबाबा यांना एकदा संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले.
मुलगी माझी होऊ शकली नाही, दुसऱ्यांची कशी होईल? : धर्मरावबाबा
आयुष्यभर इतर पक्ष फोडण्याचे काम केल्यानंतर शरद पवार माझे घर फोडायला निघाले आहेत ,असा आरोप मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला. कन्या भाग्यश्री आत्राम व जावई ऋतुराज हलगेकर यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी त्यांनी ताकद लावली आहे. अहेरीत मेळावा घेऊन ते प्रवेश करवून घेणार आहेत, असे सांगून त्यांनी माझी मुलगी माझी होऊ शकली ती दुसऱ्यांची कशी होणार, असा सवाल केला. एक मुलगी व जावई सोडून जात असले तरी भाऊ, मुलगा, दुसरी मुलगी व संपूर्ण परिवार माझ्यासोबत आहे, असे ते म्हणाले.