घरात फूट पाडू नका, मी चूक केली..., अजित पवार यांचे भाग्यश्री आत्राम यांच्या संभाव्य बंडावर भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 06:54 AM2024-09-07T06:54:25+5:302024-09-07T06:54:45+5:30
Maharashtra Assembly Election 2024: घर फोडण्याचे काम काही जण करत आहेत. घरात फूट पडणे समाजाला आवडत नाही, मी चूक केली, तुम्ही ती करू नका, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या व माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या कथित संभाव्य बंडावर भाष्य केले.
गडचिरोली - घर फोडण्याचे काम काही जण करत आहेत. घरात फूट पडणे समाजाला आवडत नाही, मी चूक केली, तुम्ही ती करू नका, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या व माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या कथित संभाव्य बंडावर भाष्य केले. आलापल्ली (ता. अहेरी) येथे शुक्रवारी अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेनिमित्त संवाद साधला. भाग्यश्री आत्राम या शरद पवार यांना भेटल्याच्या चर्चा होत्या. त्या अहेरीतून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचा कयास आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री धर्मरावबाबा यांनी भरसभेत पहिल्यांदाच जाहीररीत्या भाष्य केले. हाच धागा पकडून अजित पवार यांनी स्वत:चे उदाहरण दिले.
लग्नानंतर मुलगी सासरी जाते, पण धर्मरावबाबांनी तुम्हाला येथेच राजकारणात संधी दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष केले. वस्ताद कुस्तीचे सगळे डाव शिकवतो व एक राखून ठेवतो, असा इशाराही त्यांनी दिला. ज्या बापाने जन्म दिला, त्याच्याच विरोधात लढणार का? असा सवालही अजित पवार यांनी केला.