लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : तालुक्यात सध्या एकलपूर मार्गावर पट्टेदार वाघाचे रोजच दर्शन होत असल्याने या मार्गावर असणाऱ्या गावकऱ्यांना स्वगावी जाण्यासाठीही पेच निर्माण झाला आहे. हा मार्ग वाघाच्या अस्तित्वामुळे धोकादायक झाल्याने एकलपूर मार्गावर जाणे नको रे बाबा...! वाघ आहे, असे म्हणण्याची पाळी नागरिकांवर आली आहे. देसाईगंज तालुक्यातील वन विभाग कार्यालयाच्या मागील परिसर ते वळूमाता प्रक्षेत्र या परिसरात जंगल आहे. मागील आठवड्यात लाखांदूर जंगल परिसरातून स्थलांतरित झालेला पट्टेदार वाघ या परिसरात दिसून आल्यानंतर वन विभागाने लागलीच यंत्रणा कार्यान्वित केली. मात्र, याच काळात पुन्हा दुसरा पट्टेदार वाघ दिसल्याने देसाईगंज ते एकलपूर, कोरगाव, बोडधा मार्गावरून प्रवास करणे धोकादायक असल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या दहावीची परीक्षा सुरू असल्याने बोडधा, कोरेगाव, एकलपूर येथील विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी याच मार्गाचा अवलंब करतात. त्यांनी मार्ग बदलून प्रवास करावा, जेणेकरून कोणतीही जीवित हानी होणार नाही, असेही सुचविण्यात आले आहे. एकंदरीत एकलपूर मार्ग सध्यातरी दुचाकी, सायकलस्वार, पादचारी यांच्यासाठी धोकादायक ठरला आहे.
५ ते ९ वाजेपर्यंत मार्ग बंद दरम्यान गुरुवारी एकलपूर वन व्यवस्थापन समिती आणि वन विभागाची संयुक्त बैठक एकलपूर या ठिकाणी उपसरपंच विजय सहारे, वनपरिक्षेत्राधिकारी विजय धांदे व गावकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यात या मार्गाच्या आजूबाजूला, मार्गावर वाघ दिसून येत असल्याने मानव-वन्यजीव संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एकलपूरकडे जाणारा मार्ग हा पहाटे पाच ते सकाळी ९ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येईल, असे ठरविण्यात आले.