गडचिरोली / चंद्रपूर : राज्यात नक्षली कारवाया व त्यांचा प्रभाव कमी झाल्याचे वाटत असले तरी, शहरी नक्षलवादाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सरकारविरुद्ध आकस निर्माण करून स्वत:साठी अनुकूल जनमत तयार करणारा एक वर्ग समाजात सक्रिय आहे. वेळीच काळजी घेऊन त्यांना नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी गडचिरोली येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी तथा माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, आ. धर्मरावबाबा आत्राम, जि. प.च्या माजी अध्यक्षा भाग्यश्री आत्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
पवार म्हणाले, विकासापासून वंचित असलेल्या समाजघटकाने नक्षलवादाला प्रतिसाद दिला आणि तो फोफावत गेला. त्यामुळे हा सामाजिक-आर्थिक विषय आहे. त्याला विकास हेच उत्तर आहे. विकासात्मक कामातील अडथळे रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी काम करावे. याशिवाय दळणवळणाची साधने वाढविणे गरजेचे आहे. मी मुख्यमंत्री असताना विशेष तरतूद करून बीआरओ (बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन)च्या माध्यमातून या भागात रस्ते बनविले होते, याची आठवणही त्यांनी सांगितली.
शेती आणि औद्योगिकरणाला पाठबळ हवे
- विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी शेतीचा विकास आणि औद्योगिकरणाला पाठबळ देण्याची गरज आहे. नव्या पिढीमध्ये येत असलेले नैराश्य त्याने घालविता येईल, असे पवार म्हणाले.
- सुरजागड लोहखाणीसंदर्भात जे काही गैरसमज आहेत, ते चर्चेतून दूर केले पाहिजेत. संबंधित कंपनीच्या मालकांनी, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी लोकांना समजावून सांगितले पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.
आम्हाला संघटनेसोबत सरकारही चालवायचे आहे
- काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी अलीकडेच विदर्भात राष्ट्रवादीचे दुकान बंद होईल, असे वक्तव्य केले. त्यावर बोलताना पवार म्हणाले, सोनियाजी दिल्लीत सर्व समविचारी पक्षांनी एकत्र राहावे अशी भूमिका व्यक्त करत असतात. त्याच्याशी सुसंगतपणे आम्ही वागत असतो. पक्ष वाढविण्याचा सर्वांना अधिकार आहे. पण आम्ही पक्ष चालवत असताना राज्याचे सरकारही चालवायचे आहे याचे भान ठेवतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
दंगलीमागे देशाची सूत्र सांभाळणारी विचारधारा
अमरावती, नांदेड व मालेगावमध्ये अलीकडे झालेल्या जातीय दंगलीमागे देशाची सूत्र सांभाळणारी विचारधारा जबाबदार असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शनिवारी मूल येथे गुरुवारी आयोजित पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात केला.