लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कुटुंब तसेच स्वत:ची काळजी घेत यावेळी दिवाळी सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. दिवाळी उत्सव कोविड कालावधीत साजऱ्या केलेल्या अन्य उत्सवांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन धुमधडाक्यात नाही तर साधेपणाने साजरा करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केले आहे.राज्यातील धार्मिक स्थळे अद्याप खुली करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे दिवाळी उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहिल यांची पुरेपूर दक्षता घेण्यात यावी. कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक उपक्रम/कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. आयोजित करावयाचे झाल्यास शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करुन ऑनलाईन पध्दतीने आयोजित करावे.प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत शासन/प्रशासनाकडून काही अतिरिक्त सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. शासनाचे मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. नियमांचे पालन होते की नाही, याबाबत प्रशासनातील अधिकारी पाहणी करतील.तथापि, सदरील आदेशाचे पालन न करणारी/ उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष दीपक सिंगला यांनी कळविले आहे.सामाजिक उपक्रम घ्याकोरोना विषाणू (कोविड-१९) मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई असेल. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे असे उपक्रम आयोजित करावे. मलेरीया, डेंगू, कोरोना आदी आजार व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सिंगला यांनी केले आहे.आतिषबाजीऐवजी दिव्यांची आरास करादिवाळी हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवादरम्यान दरवर्षी मोठ्याप्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. त्यामुळे कोरोना आजारामुळे बाधित झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायु प्रदुषणाचा थेट परिणाम होऊन श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यावर्षी शक्यतो फटाके फोडण्याचे टाळावे. त्याऐवजी दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा.
यावर्षी दिवाळी धुमधडाक्यात नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 5:00 AM