लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आणि चर्चा सुरू असली तरी गडचिरोली जिल्ह्यात मात्र कोरोना रुग्णांची संख्या आता घटण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे. तरीही आरोग्य विभाग कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याच्या विविध उपचार केंद्रांमध्ये १३८५ बेड उपलब्ध आहेत. त्यापैकी केवळ ३०७ बेडवर रुग्ण असून १०७८ बेड अजूनही शिल्लक आहेत.देशाच्या काही भागात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे म्हटले जाते. अनलॉक प्रक्रियेत अनेक व्यवहार आणि आता शाळाही सुरू झाल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढेल की काय, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र गेल्या पाच दिवसात कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी होणे ही बाब जिल्हावासियांना दिलासा देणारी आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढलेच तर त्यासाठी ठिकठिकाणची रुग्णालयेही सज्ज आहेत. सध्या जिल्हाभरात ५१० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. पण त्यातील ३०१ रुग्णच विविध ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उर्वरित २०९ जण गृह विलगीकरणात असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. कोरोनाची लक्षणेविरहित रुग्णांना स्वत:च्या घरीच राहून उपचार घेण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने उपचारासाठी तयार केलेले अनेक बेड अजूनही रिकामेच आहेत.विशेष म्हणजे कोविड रुग्णांवर उपचारासाठी तयार केलेल्या आरोग्य केंद्रांमध्ये आदिवासी विभागाच्या वसतिगृहांचा समावेश आहे. पण येत्या १ जानेवारीपासून आदिवासी आश्रमशाळा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून तसे झाल्यास आरोग्य विभागाला पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बेड किंवा व्हेंटीलेटर्सची कमतरता नाही. क्रियाशिल कोरोना रुग्णांची संख्या ९९० पर्यंत गेली तरीही बेड शिल्लक होते. आता तर ही संख्या ५१० वर आली आहे. त्यातच आता रुग्णांसाठी होम आयसोलेशनची सुविधा असल्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही.- डॉ.विनोद म्हशाखेत्रीसाथरोग अधिकारी, गडचिरोली
‘डोन्ट वरी...’ कोविड रुग्णांसाठी जिल्ह्यात 1078 बेड शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 5:00 AM
सध्या जिल्हाभरात ५१० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. पण त्यातील ३०१ रुग्णच विविध ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उर्वरित २०९ जण गृह विलगीकरणात असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. कोरोनाची लक्षणेविरहित रुग्णांना स्वत:च्या घरीच राहून उपचार घेण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने उपचारासाठी तयार केलेले अनेक बेड अजूनही रिकामेच आहेत.
ठळक मुद्देकेवळ ३०७ रुग्ण भरती : रुग्णसंख्या पुन्हा घटण्याच्या मार्गावर